रात्रीच्या वेळी घनदाट जंगलात जाऊन वाळूतस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:29+5:302021-04-09T04:11:29+5:30
-- शिरूर : अत्यंत घनदाट जंगल परिसरातील भांबर्डे (ता. शिरूर) येथे वाळू तस्करी होत असलेल्या तळ्यात रात्रीच्या ...
--
शिरूर : अत्यंत घनदाट जंगल परिसरातील भांबर्डे (ता. शिरूर) येथे वाळू तस्करी होत असलेल्या तळ्यात रात्रीच्या वेळी छापा मारीत एक जेसीबी मशिनसह वाळूने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेत तहसीलदार लैला शेख यांनी पुन्हा एकदा वाळूतस्करांच्या उरात धडकी भरवली आहे. अवघ्या चार कर्मचाऱ्यांना घेऊन केलेल्या या कामगिरीमुळे वाळूतस्करांसाठी दबंग ठरलेल्या तहसीलदार शेख यांच्या कामगिरीचे अवघ्या तालुक्यात कौतुक सुरु आहे.
घटनेची माहिती देताना तहसीलदार शेख म्हणाल्या की, भांबर्डे येथील तळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळूतस्करी सुरु असल्याच्या तक्रारी येत होत्या. तीन वेळा महसूल पथकाने त्या ठिकाणी छापा मारला, मात्र तस्करांना खबर मिळाल्याने ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. याबाबत रांजणगाव गणपती पोलिस ठाण्यालाही वाळूतस्करी सुरु असल्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र तरी तस्करीचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी अशी धडक कारवाई करण्यात आली. पथक दाखल होताच जेसीबी व वाळूने भरलेला ट्रॅक्टर चालकांनी वाहनांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाहने आडवी घालून थांबविण्यात आले. मात्र अंधाराचा फायदा घेत चालकांनी वाहनांतून उद्या मारून धूम ठोकली. मात्र वाळू व ती दोन्ही वाहने ताब्यात घेतली.
या कारवाईमध्ये तलाठी के. एम. जाधव, एस. बी. शिंदे, दशरथ रोडे, सुशीला गायकवाड सहभागी झाले होते. तालुक्यात ज्या ठिकाणी वाळूतस्करी सुरु असेल, त्याबाबत जनतेने मला मोबाईल किंवा अर्जादारे कळवावे, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल व तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे शासन व पर्यावरण यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, असे आवाहन तहसीलदारांनी केले.
--
पोलीस संरक्षणाची मागणी
वाळू तस्करांच्यावर कारवाईही रात्रीच करावी लागते, वाळूतस्कर व त्यांचे म्होरके यांच्यावर कारवाई करताना माझ्या जिवाला धोका होण्याची शक्यता असते, त्यामुळे मला पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी तहसीलदार लैला शेख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक पुणे यांच्याकडे केली आहे.