फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 08:09 PM2018-08-18T20:09:46+5:302018-08-18T20:20:53+5:30

सध्या या जागेवर १ हजार मेट्रीक टन कचरा रोज येत असतो. त्यातील ५०० मेट्रीक टन करता त्वरीत कमी करण्यात येणार आहे.

going garbage of fursungi wiil be stop in coming soon : vijay shivtare | फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे

फुरसुंगीला जाणारा कचरा बंदच करणार : विजय शिवतारे

googlenewsNext
ठळक मुद्देसंयुक्त बैठकीत निर्णय, ३१ डिसेंबरपर्यंत मुदत कचरा डेपो डिसेंबर २०१९ अखेर पुर्णपणे बंद करण्याबाबत आयुक्तां आश्वासन सध्या आलेल्या ११ गावांचा सांडपाणी निर्मुलन आराखडा तयार

पुणे: फुरसुंगी, उरूळी देवाची येथील कचरा डेपोत जाणारा कचरा कमी करणार व ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत तिथे जाणारा कचरा पुर्णपणे बंदच करणार असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. कचरा डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या वारसांना महापालिकेत येत्या दोन महिन्यात नोकरी देण्याबाबत व अन्य काही महत्वाच्या गोष्टींबाबत शनिवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आले.
आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, तसेच अन्य अधिकारी व फुरसुंगी, उरूळी देवाची येथील प्रमुख ग्रामस्थ, विसर्जीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदी बैठकीला उपस्थित होते. शिवतारे यांनी नंतर बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. कचरा डेपो डिसेंबर २०१९ अखेर पुर्णपणे बंद करण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या या जागेवर १ हजार मेट्रीक टन कचरा रोज येत असतो. त्यातील ५०० मेट्रीक टन करता त्वरीत कमी करण्यात येणार आहे. समाविष्ट गावांमधील ५ गावांमध्ये प्रत्येकी १०० टनांचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करून तिथे हा कचरा जिरवला जाईल. उर्वरित ५०० टन कचरा कमीकमी करत डिसेंबर अखेर डेपोत कचरा आणण्याचे पुर्णपणे थांबवले जाईल. यासाठीचे वेळापत्रकच आयुक्तांनी बैठकीत सादर केले असून त्याप्रमाणे काम केले जाईल असे शिवतारे म्हणाले.
डेपोत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे एकूण ५७ वारस आहेत. त्यातील ४० जणांच्या वारसा हक्काबाबत काहीच संदेह नाही. त्यांना त्वरीत महापालिकेच्या सेवेत घेण्यात येईल. उर्वरित १७ जणांनी न्यायालयाकडून तेच वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणल्यानंतर त्यांनाही सेवेत घेतले जाईल. फुरसुंगी व उरूळी देवाचीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून ७२ कोटी रूपयांची पाणी योजना राबवली जात आहे. आता ही गावे महापालिकेत आल्यामुळे त्यांना माणशी १५० लिटरप्रमाणे पाणी द्यावे लागणार आहे. त्यासाठी योजनेत काही बदल करावे लागतील. त्याबाबत प्राधिकरण व महापालिका यांच्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घ्यावी व काय बदल करावे लागतील त्याची चर्चा करावी अशी सुचना केली असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली.
सध्या आलेल्या ११ गावांचा सांडपाणी निर्मुलन आराखडा तयार केला जात आहे. आणखी काही गावे पुढच्या तीन वर्षात महापालिकेत येणार आहे. आराखडा करताना याही गावांना त्यात सहभागी करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे. काही गावांमध्ये तातडीचे कामे करणे गरजेचे आहे. गंगासागर येथे १६ ते १७ गल्ल्यांमध्ये बिकट स्थिती झाली आहे. तिथे त्वरीत रस्ते करावेत. प्रमुख रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातील व पावसाळा संपल्यानंतर कामही सुरू केले जाईल. राज्य सरकारने या गावांसाठी विशेष निधी दिला नाही, मात्र मुख्यमंत्री स्तरावर त्याबाबत चांगला निर्णय होईल अशी अपेक्षाही शिवतारे यांनी व्यक्त 
केली.--------------------
  जबाबदारी महापालिकेचीच  
महापालिका केशवनगर, लोहगाव, सूखसागरनगर व अन्य २ गावांमध्ये प्रत्येकी १०० टन असे एकूण ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करणार आहे. त्या गावांमधून याला विरोध झाला तर असे विचारले असता शिवतारे यांनी महापालिकेने ते पाहून घ्यावे असे सांगितले. फुरसुंगीने २१ वर्षे हा त्रास सहन केला आहे, त्या बदल्यात महापालिकेने तिथे काही विशेष खर्च केलेला नाही. आता या गावांमधूनही महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे, त्याचा समावेश महापालिकेत झाला आहे, त्यामुळे तिथे विकासाचा समतोल साधला जाईल अशी अपेक्षा शिवतारे यांनी व्यक्त केली. 
....................
कचरा डेपो बंद होणार या शिवतारे यांच्या वक्तव्याला खो देणारी माहिती आयुक्त सौरव राव यांनी नंतर दिली. त्यांनी सांगितले की बैठकीत कचरा कमी करण्याबाबत टाईमलाईन प्रोग्रॅम ठरवण्यात आला. डेपो तिथे राहणारच, ड्राय कचरा आणून त्यावर तिथे प्रक्रिया केली जाईल. कचरा आणून डंप केला जाणार नाही. ती सर्व जागा महापालिकेच्याच मालकीची असून प्रसंगी त्यावरील आरक्षण बदलून तिथे उद्यानासारखे प्रकल्प करू, पण एक इंचही जागा कोणाला दिली जाणार नाही असे राव म्हणाले. 

Web Title: going garbage of fursungi wiil be stop in coming soon : vijay shivtare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.