हरिश्चंद्रगडावर जाताय सावधान : मद्यपींवर राहणार ट्रेकर्सची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 02:50 AM2017-12-31T02:50:42+5:302017-12-31T02:50:53+5:30
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गडकिल्ल्यांवर विशेषत: हरिश्चंद्रगडावर जायचा प्लॅन केला असाल किंवा करीत असाल तर सावधान! तुमच्यावर सातत्याने कुणाची तरी नजर राहणार आहे. दारूच्या बाटल्या तुमच्याकडे आढळल्या तर तुमची गय केली जाणार नाही.
- नम्रता फडणीस
पुणे : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गडकिल्ल्यांवर विशेषत: हरिश्चंद्रगडावर जायचा प्लॅन केला असाल किंवा करीत असाल तर सावधान! तुमच्यावर सातत्याने कुणाची तरी नजर राहणार आहे. दारूच्या बाटल्या तुमच्याकडे आढळल्या तर तुमची गय केली जाणार नाही. बाटल्या खाली ठेवूनच गडावर जा, असे ते तुम्हाला एकदा प्रेमाने समजावून सांगतील. पण तुम्ही ऐकले नाहीत आणि अरेरावीची भाषा केलीत तर तुम्हाला ते मारणार नाहीत. मात्र कदाचित उठाबशा काढण्याच्या शिक्षेलाही तुम्हाला सामोरे जावे लागेल.
दि. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एका टेÑकर्स ग्रुपने ‘हरिश्चंद्रगड साफसफाई आणि दारूबंदी मोहीम’ हाती घेतली असून, दारूड्या पर्यटकांना अशा पद्धतीने ‘हिसका’ दाखविण्याचा पवित्रा ‘मावळ्यां’नी घेतला आहे.
महाराष्ट्रातील दुर्गवैभवाच्या संवर्धनाची जबाबदारी वनविभाग आणि पुरातत्त्व खात्याकडे असली तरी मनुष्यबळाच्या अभावामुळे पर्यटकांवर अंकुश ठेवणे ही अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी टेÑकर्सनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या संवर्धन मोहिमा राबविण्यास सुरुवात केली आहे.
‘गडकिल्ले हे केवळ दगड-धोंडे नाहीत, केवळ पिकनिक स्पॉट नाही तर छत्रपती शिवाजीमहाराजांचे श्वास आहेत, मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत. ज्या ठिकाणी अनेक लढाया झाल्या आहेत आणि अनेक मावळ्यांनी आपले रक्त सांडून आपले प्राण गमावले आहेत.
त्या ठिकाणी बसून दारू ढोसायचा प्रयत्न केला जातो. काही दारूडे लोक महाराजांच्या किल्ल्यांवर येतात आणि येताना सोबत दारू, ग्लास, प्लास्टिक घेऊन येतात आणि कचरा तिकडेच टाकून गडाचे पावित्र्य भंग करतात. म्हणूनच आता टेÑकर्सनेच थोडी कडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी शनिवार आणि रविवार थंडी आहे, म्हणून दारू घेऊया
आणि किल्ल्यावर मस्त रात्रीची
दारू ढोसूया असे प्लॅनिंग केले असेल तर त्यांना धडा शिकविण्याचे आम्ही काम करत असल्याचे डोंबिवलीच्या ड्रिफर टेÑकिंग ग्रुपचा संस्थापक यश जागे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
यश म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम आम्ही राबवित आहोत. दरवर्षी गडावर कचरा साठतोच आहे, टेÑकर्स गडाची साफसफाई करीत आहेत. पर्यटकांना शांततेत समजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण त्यातून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे कधीतरी गडावर दारू पिणारे कायदा मोडू शकतात. मग आम्हीही त्यांच्यात वचक निर्माण व्हावा, यासाठी त्यांना थोडी शिक्षा करतो. मात्र मारत वगैरे नाही, तर केवळ उठाबशा काढायला लावतो. मागच्या वर्षी हे केल्याने दारू पिणाºयांची संख्या कमी झाल्याचे गावकरी सांगत आहेत. जागेचे पावित्र्य राखले जावे हा उद्देश तर आहेच, पण उद्या जर दारू पिऊन कुणाचा तोल गेला आणि कुणी कड्यावरून खाली पडले तर गडाचे दरवाजे टेÑकर्ससाठी कायमचेच बंद होण्याची भीती अधिक आहे. तसे व्हायला नको आहे. यासाठी आम्ही ही मोहीम राबवित आहोत.’’
मागच्या वर्षीपासून गावकरीही आम्हाला सहकार्य करीत आहेत. कोण ग्रुप दारू घेऊन आला आहे, त्याची माहिती ते आम्हाला देत असल्याचे त्याने सांगितले.
हरिश्चंद्रगडाचे पावित्र्य गेल्या दोन वर्षांपासून जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. यंदाही ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी मोहीम आम्ही राबवित आहोत. गडावर दारूबंदीचे फलक लावले असतानाही काही पर्यटकांकडून दारूच्या पार्ट्या केल्या जातात. यासाठी गडाच्या खालीच पर्यटकांना आम्ही दारूची बाटली बरोबर आहे का? विचारतो. महिला, लहान मुलांना कोणताही त्रास देत नाही. बाटली सापडली तर ती काढून ठेवायला सांगतो. कुणी दादागिरी केली अथवा शिवीगाळ केली तर आमच्या पद्धतीने त्यांना समज देतो. गेल्या वर्षी पुणे, मुंबई, नाशिकमधल्या २३ लोकांना आम्ही पकडले.
- यश जागे, ड्रिफर्स टेÑकिंग ग्रुप