जिल्हा प्रशासनाकडून दुबार मतदारांची घरी जाऊन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:34 PM2018-05-24T13:34:43+5:302018-05-24T13:34:43+5:30
मतदार यादीत नाव नोंदविणे,मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार
पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदविणे,मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार आहेत. मतदार यादीतील दुबार अथवा समान नावे असलेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जाऊन पडताळणी केली जाईल. त्यानंतर ज्या ठिकाणी मतदार आढळून येईल, अशा ठिकाणी मतदाराचे नाव कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उपजिल्हा निवडणुक अधिकारी मोनिका सिंह या वेळी उपस्थित होत्या. भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी यांना प्रशिक्षण, सर्व बीएलओंची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण , मतदार यादीतील तफावतींचा शोध, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण , मयत, दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करणे आदी कामे करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचे पुनर्निरीक्षण सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील दुबार अथवा समान असलेली नावे संगणक प्रणालीद्वारे शोधली जर्तील. त्यामध्ये समान अथवा दुबार नाव आढळ्यास त्या मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात येईल. दुबार नाव असल्यास मतदाराकडून मतदार यादीतील नाव वगळण्यासाठीचा अर्ज भरून घेतला जाणार आहे.
मतदारयादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि नव्याने माहिती घेण्यासाठी बीएलओ घरोघरी जाणार आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ट केली जाणार आहेत. ही मोहिम २० जून २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात ७ हजार ५३४ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.