गावाबाहेर जाताय, कुलूपबंद घर सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:44+5:302021-09-27T04:11:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लाॅकडाऊननंतर आता नागरिक घरातून बाहेर पडू लागले आहेत. त्याचबरोबर बंद घरे पाहून घरफोडी करणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाॅकडाऊननंतर आता नागरिक घरातून बाहेर पडू लागले आहेत. त्याचबरोबर बंद घरे पाहून घरफोडी करणाऱ्या चोरांचे फावले असून, दरदिवशी शहरातील घरफोड्यांमध्ये वाढ होताना दिसू लागली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
लॉकडऊनमुळे २०२० मध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली होती. २०१९ च्या तुलनेत जवळपास निम्म्या घरफोडीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, आता दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा सर्व व्यवहार सुरू झाले. गौरी गणपतीनिमित्त लोक गावी जाऊन आले. या काळात पुन्हा एकदा चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे.
घरफोडी करणाऱ्या टोळ्या शहरात वावरत असतात. ते वेगवेगळी कामे असल्याचा बहाणा करून इमारतीत शिरतात. कोणती घरे बंद आहेत, याची रेकी करतात. त्याची माहिती साथीदारांना कळवितात. त्यानंतर सराईत चोरटे बंद घरे हेरून चोरी करीत असल्याचे आढळून येत आहे.
आठ महिन्यांत २६२ घरफोड्या
जुलै २०२१ अखेर पुणे शहरात १७८ घरफोडीचे गुुन्हे घडले होते. एकट्या ऑगस्ट महिन्यात तब्बल ९४ घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अनेक ठिकाणी एकाच इमारतीतील एकापेक्षा अधिक फ्लॅटमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ते पाहता ही संख्या आणखी मोठी आहे. ऑगस्ट २१ अखेर शहरात २६२ घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते. २३ सप्टेंबरअखेर शहरात २८८ घरफोड्या झाल्या आहेत.
अवघ्या पाऊण तासात घर साफ
शहरातील दिवसाच्या घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. हडपसर येथील एक महिला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली. साधारण पाऊण तासाने ती परत आली. तोपर्यंत चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आतील सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
शहरातील घरफोडीचे गुन्हे उघड झालेले गुन्हे
२०१७ ७५३ ३९०
२०१८ ६०० २७२
२०१९ ४६० २५७
२०२० ३४४ १९३
२०२१ १७८ ७६
जुलैअखेर