देखावे पाहण्यास जाताय, मोबाइल सांभाळा! दगडूशेठ गणपती परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:35 AM2022-09-06T09:35:58+5:302022-09-06T09:46:47+5:30
आंध्र प्रदेशची महिला टोळी जाळ्यात
पुणे : गौरी विसर्जनानंतर आता गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मध्य वस्तीत गर्दी आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी जाताना आपला मोबाइल सांभाळा, असे आवाहन करण्याची वेळ आली आहे. कारण दगडूशेठ हलवाई गणपती ते मंडई या परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल चोरीला जात आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने आंध्र प्रदेशातील ४ महिलांना मोबाइल चोरताना पकडले आहे.
आगुराम्मा गिड्डीआण्णा गुंजा (वय ३५), आमुल्ला आप्पुतोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा (वय ३७), अनिता पिटला सुधाकर (वय २१), सुशीला इसाम तंपीचेट्टी (वय ३५, सर्व रा. आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
खराडी येथे राहणाऱ्या महिला या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मंडपात मोठी गर्दी झाली होती. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पर्सची चेन उघडून त्यातील ४० हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला होता. त्याअगोदर काही महिलांचे मोबाइल चोरीला गेले होते. त्यामुळे पोलीस महिलांवर नजर ठेवून हाेते. तसेच सीसीटीव्हीवरून नजर ठेवण्यात येत होती. त्यावेळी या महिला आढळून आल्या.
लालबागला केल्या चोऱ्या
या महिलांकडे चार मोबाइल आढळून आले. त्यातील तीन मोबाइल हे मुंबईतील लालबाग गणपती मंडळाच्या परिसरातून चोरले होते. चौथा त्यांनी नुकताच एका महिलेचा माेबाइल चोरला आणि त्या पोलिसांच्या तावडीत सापडल्या. एका तरुणाच्या पँटच्या खिशातून २ हजार रुपयांची रक्कम चोरत असताना संदीप सुनील बोरसे (वय २७, रा. धुळे) या चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.
अशी हाेते चाेरी
- गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या शहरांतील चोरटे हात साफ करून घेण्यासाठी पुण्यात येत असतात. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यानंतर बहुतांश भाविक बाबू गेनू व तेथून मंडईच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातात. तुळशीबागेसमोरील रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्याचाच फायदा घेऊन चोरटे लोकांचे मोबाइल, पर्समधील वस्तू चोरून नेत आहेत.
- साधारण ५० ते ६० मोबाइल येथून दररोज चोरीला जात असल्याचे समजते. मात्र, पोलीस वेबसाइटवर लॉस्ट ॲन्ड फाउंडवर तक्रार करायला सांगत असल्याने किती जणांचे मोबाइल चोरीला जातात, याचा नेमका आकडा समोर येत नसला तरी किमान ५० मोबाइल चोरीला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक टोळ्या येथे सक्रिय असल्याचे यावरून दिसून येत आहे.
गुन्हे शाखेची खास पथके
या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची तीन पथके येथे साध्या वेशात तसेच गणवेशात बंदोबस्तावर नेमण्यात आली आहेत. याचबरोबर दगडूशेठ हलवाई मंडळाचे सीसीटीव्ही व या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण २४ तास तपासले जात आहे. तशी फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखेचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.