गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी डॉ. बिवेक देबरॉय पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष
By श्रीकिशन काळे | Published: July 5, 2024 08:19 PM2024-07-05T20:19:13+5:302024-07-05T20:19:46+5:30
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये देबरॉय यांनी अनेक पदे भूषविली आहेत
पुणे : सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बिवेक देबरॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच भारत सरकारसाठी थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या नीती आयोगाचेही ते सदस्य होते.
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. अर्थशास्त्र आणि धोरण निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय प्रभावी आणि महत्त्वपूर्ण आहे. पुरातन भारतीय साहित्य क्षेत्रात त्यांनी विपुल प्रमाणात भांषातर तसेच संशोधनपर लेखकाचे काम केले. त्यांच्या या योगदानासाठी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे सर आर. जी. भांडारकर स्मृती पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला होता. भारतीय नागरिकत्व सन्मानातील चौथ्या क्रमांकाचा सन्मान पद्मश्री देखील त्यांना प्रदान केला आहे. त्यांनी सुरवातीच्या काही वर्षात गोखले इन्स्टिट्यूटमध्येही (१९८३-८७) काम केले आहे. त्यांनी यापूर्वी डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्यूएट ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणेचे कुलपतीपदही भूषविले आहे. केंद्र सरकारच्या संस्थांमध्येही त्यांनी काम केले असून, नीती आयोगाचे ते सदस्य होते. भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष म्हणून २०१८-२२ मध्ये कार्य केले.
कुलपतीपदी डॉ. देबरॉय यांची नियुक्ती गोखले संस्थेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी संस्थेला शिक्षण, संशोधन तसेच धोरण निर्मिती क्षेत्रात उच्च पातळीवर नेऊन ठेवू शकतील.