गोखले इन्स्टिट्यूटचा परीक्षा पॅटर्न वापरण्यासाठी चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:54 AM2020-07-15T00:54:59+5:302020-07-15T00:55:20+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अभिमत विद्यापीठांना बंधनकारक असले तरी राज्य शासनाच्या आदेशाचेही उल्लंघनही करता येत नाही. पुणे जिल्ह्यात सहा अभिमत विद्यापीठे आहेत.
पुणे : गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अभिमत विद्यापीठाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात आॅनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या. त्याच पध्दतीने परीक्षा घेण्यासाठी इतर काही अभिमत विद्यापीठांकडून परीक्षांबाबत चाचपणी सुरू आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अभिमत विद्यापीठांना बंधनकारक असले तरी राज्य शासनाच्या आदेशाचेही उल्लंघनही करता येत नाही. पुणे जिल्ह्यात सहा अभिमत विद्यापीठे आहेत. त्यात गोखले इन्स्टिट्यूट, डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ या विद्यापीठांचा समावेश आहे. त्यातील सिंबायोसिस व गोखले इन्स्टिट्यूटने परीक्षा घेतल्या आहेत.
परीक्षा कशा घ्याव्यात याबाबतचे सर्वाधिकार विद्यापीठांना आहेत. त्यामुळेच गोखले इन्स्टिट्यूटने १ ते ८ जुलै या कालावधीत आॅनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रा. राजस परचुरे यांनी दिली.
यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाच्या आदेशाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या इतर राज्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली जातील, असे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी सांगितले.