गोकवडी शाळेत भरला आठवडे बाजार
By admin | Published: April 2, 2017 02:58 AM2017-04-02T02:58:21+5:302017-04-02T02:58:21+5:30
भाजी... ताजी भाजी... १० रुपये किलो कांदा... अरे घ्या भाजी घ्या... ताजी ताजी भाजी घ्या... चिमुकल्यांच्या या घोषणांनी गोकवडी शाळेचा आवार
नेरे : भाजी... ताजी भाजी... १० रुपये किलो कांदा... अरे घ्या भाजी घ्या... ताजी ताजी भाजी घ्या... चिमुकल्यांच्या या घोषणांनी गोकवडी शाळेचा आवार दणाणून गेला. निमित्त होते शाळा प्रशासनाने आायोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या आठवडे बाजाराचे. ग्रामस्थ आणि पालकांनी या बाजारात खरेदी करत विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानाचे कौतुक केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकवडी (ता़ भोर) येथील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाच्या ज्ञानाबरोबरच शालाबाह्य ज्ञानात वाढ होण्यासाठी,व्यवहारीक चलनातील नाणी, नोटा यांचा परिचय होणे व नोकरीपेक्षाही उद्योग व्यवसायाची आवड निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकवडी येथे करण्यात आले होते़
या आठवडे बाजाराचे उद्घाटन सरपंच धनश्री गोरडे, उपसरपंच हैयाज शेख, पोलीस पाटील सुधाकर बांदल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शीतल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले़
या बाजारात ग्रामस्थांनी १ हजार रुपयाचा भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांचे शालाबाह्य तसेच व्यवहार ज्ञान या गुणांची स्तुती केल्याचे मुख्याध्यापक रवींद्र थोपटे यांनी सांगितले़ (वार्ताहर)