Video: पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, सोनसाखळी हिसकावताना ज्येष्ठ महिला खाली पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:30 IST2025-01-22T15:28:18+5:302025-01-22T15:30:12+5:30
पुण्यात मध्यरात्री अजिबातच पोलीस दिसत नसल्याने सीसीटीव्ही असूनही चोरट्यांची हिंमत वाढू लागली आहे

Video: पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, सोनसाखळी हिसकावताना ज्येष्ठ महिला खाली पडली
पुणे: रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चोरांनीपुणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले असून, शहरात एवढे सीसीटीव्ही असताना हे चोरटे पकडले जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत आहे. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यातील पहिल्या घटनेत, सोनसाखळी चोरांनी मंगळसूत्र हिसकावल्यानंतर त्यातील तुटलेला अर्धा भाग पुन्हा येत घेऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. यामुळे कर्वे नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी (दि. २२) सकाळी पावणे सातच्या सुमारास दोन ज्येष्ठ महिला फिरायला निघाल्या होत्या. यावेळी कर्वे नगर येथील नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे त्या असताना पाठीमागून दोन चोर दुचाकीवर आले. त्यांनी त्यातील एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. काही अंतर पुढे गेल्यावर चोरांना अर्धेच मंगळसूत्र हातात असल्याचे लक्षात आले, यामुळे त्यांनी परत मागे येत अर्धे मंगळसूत्र देखील हिसकावून घेतले. हा प्रकार देखील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, या प्रकारामुळे चोरांची हिंमत किती वाढली आहे, हे दिसून येते. अशा सोनसाखळी चोरांवर पोलिसांनी लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी मागणी पुणेकरांमधून जोर धरत आहे.
पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, सोनसाखळी हिसकावताना ज्येष्ठ महिला खाली पडली #pune#THIEF#Police#crime#womenpic.twitter.com/51H8P8PT0y
— Lokmat (@lokmat) January 22, 2025
दुसऱ्या घटनेत कोथरूड परिसरातील डी पी रोडवर असलेल्या नचिकेत सोसायटीमध्ये एक दांपत्य मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शतपावली करून घरी परतत होते. यावेळी ते सोसायटीत प्रवेश करत असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. त्यांच्या पतीने चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरटे पळून गेले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत बाणेर परसरातील शिवनेरी सोसायटीसमोरून रस्त्याने पायी जाणाऱ्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४३ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावले. ही घटना मंगळवारी (दि. २१) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोलिंग सुरू आहे का साहेब ?
शहरात सातत्याने अशाप्रकारचे गुन्हे घडत आहेत. मुळात शहरात रात्री फिरताना पोलिस पेट्रोलिंग कुठेच दिसत नसल्याची भावना पुणेकर व्यक्त करत आहेत. नळ स्टॉप चौकात पूर्वी खाद्यपदार्थांच्या दुकानांवर होणारी गर्दी पुन्हा वाढली आहे, स्वारगेट, मिल्स अशा परिसरातच पोलिस दिसून येतात. उर्वरीत शहरात मात्र पोलिस पेट्रोलिंग करतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री, पहाटे मोठ्या प्रमाणावर पोलिसांची गस्त सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी पुणेकर करत आहेत.