खरेदीचा साधला सुवर्णकांचन योग
By admin | Published: October 12, 2016 02:48 AM2016-10-12T02:48:00+5:302016-10-12T02:48:00+5:30
उत्कृष्ट मॉन्सूनमुळे बाजारात आलेला उत्साह... गेल्या पंधरवड्यात सोन्याच्या भावात तोळ्यामागे झालेली दोन हजार रुपयांपर्यंतची घट... सराफी व्यावसायिकांनी
पुणे : उत्कृष्ट मॉन्सूनमुळे बाजारात आलेला उत्साह... गेल्या पंधरवड्यात सोन्याच्या भावात तोळ्यामागे झालेली दोन हजार रुपयांपर्यंतची घट... सराफी व्यावसायिकांनी दिलेल्या आकर्षक सवलती.. याचा योग साधत खरेदीदारांनी विजयादशमीला सोन्याची लयलूट केली. तसेच व्हाइट गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्लॅटिनमच्या मागणीतही मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस ते तीस टक्क्यांनी सोनेविक्री अधिक झाल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले.
समाधानकारक पाऊस झाल्यास त्याचा चांगला परिणाम हमखास बाजारपेठेवर पाहायला मिळतो. त्याप्रमाणे सराफी बाजारात देखील त्याचा सकारात्मक परिणाम मंगळवारी दिसून आला. लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ व शहरातील विविध सराफी दुकानांत खरेदीदारांची चांगलीच गर्दी दिसून येत होती. काही सराफी व्यावसायिकांनी एक तोळे सोने खरेदीवर एक तोळा चांदी मोफत, काहींनी सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीत ५० ते शंभर टक्के सूट, हिऱ्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर शंभर टक्के सूट अशा सवलती देऊ केल्या होत्या.
याशिवाय गेल्या पंधरवड्यात सोन्याच्या दरात साडेचार ते पाच टक्क्यांपर्यंत घट झाली असल्याने खरेदीदार व गुंतवणूकदारांनी खरेदीचा सुवर्णकांचन योग साधला. मंगळवारी शुद्धतेनुसार सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर २९,९०० रुपयांपासून ते ३०,३०० रुपयांपर्यंत होता. तर चांदीचा प्रतिकिलोचा दर ४३ हजार ५०० ते ४३ हजार ६०० इतका असल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले.
याविषयी माहिती देताना सराफी व्यावसायिक वस्तुपाल रांका म्हणाले, की गेल्या आठवडाभरात सोन्याच्या भावात तोळ्यामागे बाराशे रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. गत वर्षीपेक्षा वीस टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली. सर्व प्रकारचे दागिने, वेढणी, सोन्याची नाणी यांना मागणी होती. तसेच पूर्वी सोन्यापेक्षा प्लॅटिनमचा दर जवळपास दुप्पट असे.
नवरात्रीपासूनच सोनेखरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. गेल्या पंधरवड्यात सोन्याचा भाव प्रतितोळा दोन हजार रुपयांपर्यंत घटल्याने गुंतवणुकीबरोबरच लग्नाच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल होता. पारंपरिक सोन्याबरोबरच ‘रोज गोल्ड’ला देखील अधिक मागणी होती. या सोन्यात काही मिश्रधातूंचा वापर केला जात असल्याने त्याचा रंग काहीसा गुलाबी होतो. अशा दागिन्यांना मागणी वाढत असल्याचे सराफी व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.