सोन्याची झळाळी अक्षयच

By admin | Published: April 29, 2017 04:24 AM2017-04-29T04:24:51+5:302017-04-29T04:24:51+5:30

नोटाबंदी आणि त्यानंतर सोने बाळगण्यावर कायद्यानेच मर्यादा येणार असल्याची चर्चा या मुळे सोनेबाजार थंड पडल्याचे चित्र होते.

The gold is irresistible | सोन्याची झळाळी अक्षयच

सोन्याची झळाळी अक्षयच

Next

पुणे : नोटाबंदी आणि त्यानंतर सोने बाळगण्यावर कायद्यानेच मर्यादा येणार असल्याची चर्चा या मुळे सोनेबाजार थंड पडल्याचे चित्र होते. त्यातून सावरत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सराफी बाजाराने पुन्हा झळाळी घेतली असून, मागणीच्या निर्देशांकाने तब्बल ३० ते ४० टक्क्यांची उसळी घेतली आहे.
नोटाबंदीनंतर बाजार आता पूर्वपदावर आला असल्याचे दिसून येत आहे. गुढी पाडव्यापेक्षा नागरिकांनी ३० ते ४० चाळीस टक्के सोन्याची अधिक खरेदी केल्याचे सराफी व्यावसायिकांनी सांगितले. शहरातील प्रमुख सराफी बाजार असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर शुक्रवारी रात्रीपर्यंत गर्दी होती. सोन्याचा प्रतितोळा दर २९ ते २९ हजार ४०० रुपयांदरम्यान होता. सोन्याची नाणी, अर्धा ग्रॅम वजनापासून ते दोन ते तीन तोळे वजनाचे दागिने, हिरेजडित आणि प्लॅटिनमचे दागिने अशा सर्वच प्रकारच्या आभूषणांनी जोरदार मागणी होती. सराफी व्यावसायिकांनीदेखील विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने घडणावळीच्या मजुरीवर १० ते ३० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात अली होती.
सराफी व्यावसायिक सौरभ गाडगीळ म्हणाले, गेल्या तीन वर्र्षांतील सर्वाधिक खरेदी झालेली यंदाची ही पहिलीच अक्षय तृतीया आहे. अगदी एक ग्रॅमपासून ते काही तोळ्यांमध्ये खरेदी करणारा वर्ग यामध्ये होता. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दहा ग्रॅम आतील दागिन्यांना अधिक मागणी होती. त्याचबरोबर नेकलेस, बांगड्या, हिरेजडित दागिने अशा सर्वच प्रकारच्या दागिन्यांना चांगली मागणी होती.
वास्तुपाल रांका म्हणाले, गेल्या वीस दिवसांत सोन्याच्या दरात प्रतितोळा एक हजार रुपयांनी घट झाल्याने, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. नोटाबंदीनंतर बाजार आता पुन्हा स्थिरावत असून, गुढी पाडव्यापेक्षा चांगली खरेदी शुक्रवारी झाली. नागरिकांकडील पैशांची उपलब्धता वाढल्याने बाजारातील चलनवलन वाढले आहे. कमी वजनाच्या दागिन्यांपासून हिरेजडित, प्लॅटिनमच्या दागिन्यांनाही चांगली मागणी आहे.

Web Title: The gold is irresistible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.