नेमबाजीतल्या योगदानासाठी पवन सिंह यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:08+5:302021-04-01T04:11:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ)च्या विश्वकप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ)च्या विश्वकप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्याचे पवन सिंह यांना आयएसएसएफने सुवर्ण पदकाने गौरविले.
नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात आयएसएसएफचे उपाध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआई) अध्यक्ष रनिंदर सिंह यांच्या हस्ते मानचिन्ह व मानपत्र प्रदान करीत पवन सिंह यांना गौरविण्यात आले.
पवन सिंह हे सध्या भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआई) संयुक्त महासचिव म्हणून कार्यरत असून दिल्लीत २०१९ मध्ये झालेल्या आयएसएसएफच्या वर्ल्ड कप स्पर्धेचे स्पर्धा व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले. टोकियो जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पवन सिंह यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे.
पवन सिंह म्हणाले, “प्रत्येक पदकाबरोबर एक जबाबदारी येते. या जबाबदारीसाठी आणि नेमबाजीच्या उत्कर्षासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेन. टोकियोत होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून सहभागी होणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण करताना मी पूर्णपणे झोकून देऊन कार्यरत राहीन.”