पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:15 PM2024-10-25T14:15:53+5:302024-10-25T14:16:29+5:30
पुणे पोलिसांनी सोने, चालक आणि वाहन ताब्यात घेतले असून ते कुठून आले? कुणाचे आहे? याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे
पुणे : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. दरम्यान, पुणेपोलिसांना नाकाबंदी दरम्यान सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३८ कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. पोलिसांनी हे सोने जप्त केले असून, यासंदर्भात निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला कळवण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
शहरातील विविध विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी २४ तास नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर मावळात पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. २५) सकाळी सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी छोट्या टेम्पोत पोलिसांना हे सोने आढळले. पोलिसांनी सोन्यासह चालक आणि वाहन ताब्यात घेतले आहे. संबंधित कोट्यवधींचे सोने कुठून आले? कुणाले आहे? याबाबत
याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाहन हे ट्रान्सपोर्टचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.