घरफोड्यांकडून तब्बल १ कोटींचा ऐवज हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 08:54 PM2020-02-20T20:54:33+5:302020-02-20T20:55:44+5:30
घरफाेडी करणाऱ्या चाेरट्यांना सीसीटिव्हीच्या माध्यमातून पाेलिसांनी अटक केली आहे.
पुणे : घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईतांसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या पंटरला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १०९ किलो चांदीचे दागिने, २० तोळे सोन्याचे दागिने, ५ चारचाकी वाहने, २ दुचाकी वाहने, २७ हजार रुपयांची रोकड, ५ बनावट चाव्या, घरफोडीचे साहित्य असा तब्बल १ कोटी ९ हजार ५३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा.रामटेकडी, हडपसर), जयसिंग ऊर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय २६, रा़ वैदवाडी, हडपसर) व बंडु वसंत वाघमारे (वय ३५, रा. गोसावी वस्ती हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ फेबु्रवारी रोजी घरफोडी झाली होती.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी वानवडी परिसरातील ३४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यातील फुटेजचे विश्लेषण केले असताना वाकड, चिंचवड, सिंहगड रोड परिसरात झालेल्या ज्वेलर्सच्या दुकानातील चाेऱ्यांशी मिळते जुळते असल्याचे दिसून आले. आरोपींच्या चालण्या, वागण्याच्या हावभावावरुन ते रामटेकडी, हडपसर परिसरातील असल्याचा संशय होता. पोलीस शिपाई नासीर देशमुख व नवनाथ खताळे यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यावरुन तिलकसिंग टाक व जयसिंग जुनी यांना ताब्यात घेण्यात आले़ दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली. दरम्यान आरोपींनी शहर ग्रामीण व पिंपरी-चिंचवड परिसरात केलेल्या चोऱ्या विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी व सनीसिंग पापासिंग दुधाणी यांच्यासोबत केल्याचे समोर आले. हे दोघेही साथीदार अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या तपास पथकाला सह पोलिस आयुक्तांना ५० हजारांचे पारितोषिक जाहिर केले आहे.
चोरट्यांकडून २१ गुन्हे उघडकीस
या चोरट्यांकडून एकूण २१ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यात कोंढवा ५, वानवडी ३, हडपसर, येरवडा, वाकड प्रत्येकी २ आणि मुंढवा, सिंहगड, लोणी काळभोर, चिखली, हिंजवडी, सासवड या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे़ त्यात १७ गुन्हे हे या नव्या वर्षातील आहेत.