शिवनेरीवर तान्हुल्या शिवबाचे सुवर्णालंकृत शिल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:49 AM2019-02-18T00:49:43+5:302019-02-18T00:50:07+5:30
शिवजन्म सोहळ्याची तयारी पूर्ण : पारंपरिक पाळण्यात ठेवले जाणार शिल्प
जुन्नर : बालशिवबाची सोनपावले सर्वप्रथम ज्या भूमीवर बागडली, बालशिवबासाठी राजमाता जिजाऊंनी गायलेल्या अंगाईगीताचे शब्दसूर जिथे झंकारले, त्या किल्ले शिवनेरीवर होत असलेल्या शासकीय शिवजन्मोत्सव सोहळ्यात या वर्षी तान्हुल्या शिवबाचे नवीन, आकर्षक, सुवर्णांलकृत शिल्प या वर्षीच्या शिवजन्म सोहळ्यासाठी पारंपरिक पद्धतीने पाळण्यात झुलणार आहे. शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी स्वखर्चाने हे शिल्प बनविले असून, या वर्षीच्या शिवजन्म सोहळ्यात प्रथमच पारंपरिक पाळण्यात हे तान्हुल्या शिवबाचे शिल्प ठेवण्यात येणार आहेत.
रवींद्र काजळे हे शासकीय शिवजयंती सोहळ्यासाठी हे शिल्प शासनाकडे सुपूर्त करणार आहेत. नाशिक येथील वयोवृद्ध शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी हे शिल्प बनवले आहे. यासाठी शिल्पकार विवेक खटावकर, चित्रकार दीपक सोनार यांच्या संकल्पनेतून हे शिल्प साकारण्यात आले आहे.
त्यावर खास बालरूपाला शोभेल असे कानातील मोत्याचे सोन्याचे डूल, जीवती, चांदीच्या मनगट्या, कंबरेची साखळी, तांब्याचे वाळे असे शिवकालीन दागिने पुण्यातील काजळे ज्वेलर्सचे संजय काजळे यांनी बनविले आहेत. बाल शिवबासाठी ऐतिहासिक धाटणीचा आकर्षक अंगरखा रेवती काजळे यांनीदेखील तयार केला आहे. या शिल्पासाठी किती खर्च आला, हे सांगण्यास मात्र काजळे यांनी नकार दिला. शिवछत्रपतींच्या शिल्पाचे मोल होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
रवींद्र काजळे यांनी सन २००१ मध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी खास शिवकालीन धाटणीचा पाळणा शासनाकडे सुपूर्त केला होता. तुळजाभवानीचा पलंग बनविणाऱ्या ठाकूर बंधूंकडून काजळे यांनी शिसमचा पाळणा बनवून घेतला होता. त्यासाठी लागणारे लाकूडदेखील नेसरी येथून आणण्यात आले होते.