‘हवेचे प्रदूषण’ प्रकल्पाचा सुवर्णवेध
By admin | Published: February 28, 2016 03:43 AM2016-02-28T03:43:43+5:302016-02-28T03:43:43+5:30
नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये
शिरूर : नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये सादर केलेल्या ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेचे प्रदूषण, हवेच्या प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळाले. विद्यार्थ्यांना वैयक्तिरीत्या गौरविण्यातही आले. या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी वैज्ञानिक प्रगल्भता भविष्यात देशाच्या कामी आल्यास आश्चर्य वाटायला नको.
विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी २००६ पासून ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषदे’च्या वतीने आयोजित प्रकल्प स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उमटविण्यास प्रारंभ केला. ‘दुर्लक्षित खाद्य वनस्पती’ या विषयावर त्यांनी सिक्कीम येथे प्रकल्प सादर केला. यानंतर गहू या पिकाच्या जैवविविधता (२००७), शिरूर परिसरातील सेंद्रिय व रासायनिक शेती (२००८), शिरूर परिसरातील माती (२०१०), विविध धातूंच्या भांड्यात अन्न शिजवण्यासाठी लागणारी ऊर्जा (२०१२) या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे या प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळाले.
२०१४ मध्ये विद्यार्थ्यांनी केलेला ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणावर होणारा परिणाम’ हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर गेला. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांनी चार महिने कष्ट घेतले. एमआयडीसीतील कारखान्यांचा सर्व्हे केला. अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूचे प्रमाण शोधले. प्रत्यक्ष प्रयोग करून हवेतील घटकांचे मोजमाप केले. याबाबत अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली.
एमआयडीसीतील उपलब्ध करून दिलेल्या उपकरणाच्या साह्याने कार्बन मोनाक्साइड, डायआॅक्साइड, पार्टिकल्स आदींची मोजणी केली. त्याचा अभ्यास केला. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे सभोवताली पिकांवर होणारा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. यात पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
उत्पादनावर परिणाम झाल्याचेही दिसून झाले. नागरिकांना श्वसनाचे व हृदयविषयक विकार असल्याचेही विद्यार्थ्यांना जाणवले.
(वार्ताहर)
विविध निष्कर्ष नोंदवले
हवेच्या प्रदूषणामुळे शेती प्रभावीत झाल्याचे व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचा ़िनष्कर्ष विद्यार्थ्यांनी निरीक्षणाद्वारे नोंदविले. अर्थात, यात तथ्यही आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याची निरीक्षणे आहेतच. या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले, हे गौरवास्पद आहे. मात्र, प्रकल्पाद्वारे जे निष्कर्ष समोर आले, त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, एवढे मात्र नक्की; अन्यथा प्रकल्प व निष्कर्ष हे सादरीकरणापुरतेच मर्यादित राहतील.