शाहिरीतून उलगडली इतिहासाची सुवर्णपाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:51 AM2017-08-05T03:51:28+5:302017-08-05T03:51:28+5:30

गणेशोत्सव आणि दगडूशेठ गणपतीचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास, कोल्हापूरचे वर्णन आणि छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास अशा शिवरायांपासून ते थेट गणेशोत्सवापर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे चित्र शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून उलगडले.

 Golden history of history unfolded from Shahiri | शाहिरीतून उलगडली इतिहासाची सुवर्णपाने

शाहिरीतून उलगडली इतिहासाची सुवर्णपाने

Next

पुणे : गणेशोत्सव आणि दगडूशेठ गणपतीचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास, कोल्हापूरचे वर्णन आणि छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास अशा शिवरायांपासून ते थेट गणेशोत्सवापर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे चित्र शाहिरांनी आपल्या पोवाड्यांमधून उलगडले. शाहीर हेमंतराजे मावळे, शिवशाहीर देवानंद माळी आणि शिवशाहीर रंगराव पाटील यांनी इतिहासाची सुवर्णपाने शाहिरी तिरंगा कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त गणेश कला, क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शाहिरी तिरंगा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
‘जय गजवदना गौरीनंदना’ या गणाने शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रसिकांना मोहित केले. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त दगडूशेठ गणपतीचा इतिहास आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेणारा ‘दगडूशेठ गणपती तुझ्या कार्याची महती’ या शाहीर हेमंतराजे मावळे यांनी रचलेल्या पोवाड्याचे सादरीकरण झाले. ‘गणपती बाप्पा अहो विघ्नहर्ता यावे मंगल कराया,’ ‘माझी मैना गावावर राहिली,’ ‘पाहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची,’ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या पोवाड्याने देशभक्ती जागृत केली.
शिवशाहीर देवानंद माळी यांनी ‘माझ्या राजाची शिवगीतांजली गाईन,’ शिवशाहीर रंगराव पाटील यांनी कोल्हापूरची शाहिरी रसिकांसमोर सादर केली. घ्या हो घ्या हो मानाचा मुजरा, मंगलमय तेजोमय देशा आधी तुला वंदितो या पोवाड्यांनी रसिकांची दाद मिळवली. ‘कोल्हापूर राजधानी मावळ्यांची’ आणि ‘करूया उदो उदो उदो अंबाबाईचा,’ ‘केले किती ते नवस’ या पोवाड्यांमधून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

Web Title:  Golden history of history unfolded from Shahiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.