ग्रामीण तरुणांसाठी कृषी क्षेत्रातील सुवर्णसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:23+5:302021-04-15T04:09:23+5:30
विद्यार्थी मनापासून अभ्यास करून यशस्वी होतात. ही चांगली बाब आहे. त्यामध्ये ज्यांना वर्ग १ आणि वर्ग २ अधिकारी होण्याची ...
विद्यार्थी मनापासून अभ्यास करून यशस्वी होतात. ही चांगली बाब आहे. त्यामध्ये ज्यांना वर्ग १ आणि वर्ग २ अधिकारी होण्याची आवड आहे. त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. परंतु, यासाठी कालावधी किती लागेल हे सांगता येत नाही. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी चिकाटी आणि जिद्द असावी लागते.
स्पर्धा परीक्षा व्यतिरीक्त इतरही परीक्षा देऊन नोकरीच्या संधी कृषी पदवीधरांना आहेत. विविध बँकांमधील वेगवेगळी पदे विशेषत : कृषी अधिकारी, कृषी विभागातील वेगवेगळी पदे, जसे वेगवेगळ्या रोपवाटीका, बियाण्यांसंबंधीच्या कंपन्या, माहिती तंत्रज्ञानामधील कृषीसंबंधीच्या कंपन्या यामध्येही कृषी पदवीधरांना संधी आहेत. त्याचा उपयोग कृषी पदवीधरांनी आणि कृषी शाखांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांनी घ्यावा.
कृषीसंबंधी आवड असणाऱ्या तरुणांना नोकरीव्यतिरीक्त व्यवसायाच्याही संधी आहेत. या व्यवसायामध्ये बियाण्यांची निर्मीती आणि विक्री करून चालून स्वत:चा व्यवसाय करणे. बियाण्यांबरोबर खताचा व्यवसाय करून शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्याचे समाधान मिळवणे.
दर्जेदार रोपवाटिका तयार करून गरजू शेतकऱ्यांना फळझाडांची आणि भाजीपाल्यांची रोपे निर्माण करून त्यांची विक्री करून खताचाही यशस्वी व्यवसाय निर्माण करता येऊ शकतो. दर्जेदार बियाणे, दर्जेदार रोपनिर्मितीबरोबरच झाडांना आणि पिकांना लागणारी अन्नद्रव्यनिर्मिती जसे सेंद्रिय खतांची निर्मिती, जैविक खतांची निर्मिती आणि गरजू शेतकऱ्यांना आवश्यक असणारा सल्ला देण्याची योजना उभारून स्वत:चा व्यवसाय करून ग्रामीण भागामध्ये यशस्वी उद्योजक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या उद्योगांच्या यादीत कलेलाही फार संधी आहेत. शेतकऱ्यांना हवी असणारी यंत्रे आणि अवजारे निर्मिती आणि त्यांची विक्री करण्याच्या संधी आहेत.
भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादकता वाढविण्याचे क्षेत्र अवगत केले आहे. तृणधान्ये, भाजीपाला, फळभाज्या, फळबागा, औषधी वनस्पती इत्यादीचे चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. परंतु, त्यांची विक्री व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक फायदा घेता येत नाही. पिकविलेल्या मालाचा बहुतेक नफा विक्री साखळीतील व्यापारी आणि दलाल घेत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचा माल शेतकऱ्यांनीच विकावा यासाठी भारत केंद्र आणि राज्य शासन पुढाकार घेत आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विशेषत: तरुणांनी यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करावी.
शेतीमाल गरजू ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी पदवीधर आणि इतर पदवीधर तरुण चांगला व्यवसाय उभा करू शकतात. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत विक्री केल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. त्याचबरोबर तरुणांनाही चांगला व्यवसाय करण्याच्याही संधी प्राप्त होईल. त्यासाठी अनुदान मिळण्याच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. त्यात पिकविलेल्या मालाची थेट विक्री, पिकविलेल्या मालामध्ये प्रोसेसींग करून विक्री, दर्जेदार रोपांची विक्री, बियाणे निर्मिती आणि विक्री, सेंद्रिय आणि जैविक खतनिर्मिती व विक्री, रासायनिक खतांची विक्री, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि विक्री आदींचा समावेश करता येईल, वरील सर्व बाबींचा विचार करून ग्रामीण भागातील तरुणांनी यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी या संधीचा उपयोग करावा.
- डॉ. सुरेश पवार, कृषी शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी