अहवालातील ‘गोलमाल’ अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:52+5:302021-02-23T04:14:52+5:30

पुणे : गेले काही दिवस पुणे शहरातील कोरोनाचे आकडे वेगाने वाढताना दिसत आहेत. विशेषत: १० फेब्रुवारीपासून शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ...

The ‘golmaal’ in the report still continues | अहवालातील ‘गोलमाल’ अजूनही सुरूच

अहवालातील ‘गोलमाल’ अजूनही सुरूच

Next

पुणे : गेले काही दिवस पुणे शहरातील कोरोनाचे आकडे वेगाने वाढताना दिसत आहेत. विशेषत: १० फेब्रुवारीपासून शहरातील पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढत आहे. मात्र, अकरा महिन्यांनंतरही महापालिकेचा दैनंदिन कोरोना अहवाल आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून येणारा अहवाल यातील आकड्यांमध्ये अजूनही तफावत जाणवत आहे. महापालिकेच्या दैनंदिन अहवालातील रुग्णांचा आकडा कमी, तर राज्याच्या अहवालातील आकडा जास्त अशी स्थिती अद्याप जैसे थे आहे.

महापालिकेकडून कोरोना रुग्णांसंदर्भातील दैनंदिन आकडेवारी चुकीची दिली जात असल्यामुळे पुणे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरल्यामुळे जुलै महिन्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर बरेचदा आकडेवारी जुळत नसल्याचे चित्र समोर आले. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णांचा आकडा बराचसा खाली आला. फेब्रुवारी महिन्यात हा आकडा पुन्हा वाढू लागला आहे आणि आकड्यांमधील तफावत पुन्हा समोर आली आहे. शनिवारी, २० फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या अहवालात दैनंदिन रुग्णांची आकडेवारी ४१४ इतकी होती, तर राज्याच्या अहवालात हीच संख्या ४३० होती.

दररोज सरासरी आकडेवारीमध्ये १५ ते ५० इतकी तफावत आढळून येत आहे. माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार, तयार करण्यात आली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीत बदल होऊ शकतो, असे राज्याच्या आरोग्य अहवालात नमूद आहे.

शासनाच्या कोव्हिड-१९ पोर्टलवर रुग्णांची आकडेवारी भरणे बंधनकारक असते. कोणत्याही प्रकारे अहवाल मॅन्युअली स्वीकारला जात नाही. कोणत्याही प्रयोगशाळेत चाचणी झाल्यानंतर आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तो आकडा पोर्टलवर भरणे आवश्यक असते. प्रयोगशाळा पुण्यातील असल्यास रुग्ण कोणत्या जिल्ह्यातील आहे, हे न पाहता राज्याच्या आरोग्य विभागाकडून त्याचा समावेश पुण्याच्या आकडेवारीत केला जातो. महापालिका किंवा जिल्हा स्तरावर मात्र संबंधित रुग्ण ज्या भागातील रहिवासी असेल, तिथे त्याचा समावेश केला जातो. त्यामुळे आकडेवारीत फरक दिसत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

--------------------

प्रत्येक महापालिकेला आपल्याकडील रुग्णांची संख्या कमी दाखवायची असते. एखाद्या रुग्णाचे कोरोनाचे निदान ज्या शहरात झाले, त्याच ठिकाणी त्याचे नाव समाविष्ट केले जाते. साताऱ्याच्या माणसाची चाचणी पुण्यात झाली आणि तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याचा समावेश पुण्याच्या आकडेवारीत केला जातो. आपल्या जिल्ह्याची अथवा शहराची आकडेवारी कमी दिसावी, यासाठी जिल्ह्याबाहेरील नावे त्यांच्याकडून वगळली जातात. त्यामुळे राज्याकडील आकडा जास्त आणि जिल्हा किंवा शहराकडील आकडा कमी दिसतो.

- डॉ. प्रदीप आवटे, राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी

----------------------

जिल्ह्याबाहेरील रुग्णाने पुण्याच्या हद्दीतील प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केली असल्यास राज्याच्या आरोग्य विभागाकडून त्याचा समावेश पुण्यातच केला जातो. बहुतांश प्रयोगशाळा पुण्यात असल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आदी ठिकाणचे नमुने पुण्यात तपासणीसाठी येतात. असे दररोज किमान ५० ते १०० नमुने असतात. त्यांचा समावेश पुण्याच्या आकडेवारीत केल्याने राज्याच्या अहवालातील आकडा जास्त दिसतो.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

-------------------------------

दिनांक महापालिका अहवालराज्य अहवाल

२१ फेब्रुवारी ६३४ ६४०

२० फेब्रुवारी ४१४ ४३०

१९ फेब्रुवारी ५२७ ५३५

Web Title: The ‘golmaal’ in the report still continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.