गोन्साल्विस, फरेरा यांना पुन्हा करण्यात आली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 05:54 AM2018-10-27T05:54:32+5:302018-10-27T05:54:41+5:30
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत असलेले वर्णोन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वढणे यांनी फेटाळल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.
पुणे/मुंबई : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत असलेले वर्णोन गोन्साल्विस, अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वढणे यांनी फेटाळल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.
सुधा भारद्वाज यांना देखील अटक होणार असल्याची शक्यता आहे. आॅगस्टमध्ये पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व वर्णोन गोन्साल्विस (मुंबई), अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली. मात्र, सुधा भारद्वाज व नवलाखा यांच्या ट्रान्झिट रिमांडला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. नवलखा यांना १ नोव्हेंबरपर्यंत व झारखंडचे मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टान स्वामी यांनाही ३१ आॅक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.