खरीप पिकांसाठी राज्यात चांगले वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:13 AM2021-08-26T04:13:00+5:302021-08-26T04:13:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खरीप हंगामासाठी सध्या राज्याच्या बहुतांश भागात हवामान चांगले आहे. पुरेशा पावसामुळे पिके आता वाढीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खरीप हंगामासाठी सध्या राज्याच्या बहुतांश भागात हवामान चांगले आहे. पुरेशा पावसामुळे पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत. खतांचा पहिला हप्ता देण्यास सुरुवात झाली असून, युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
कोकण, कोल्हापूर, लातूर व नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम, तर नाशिक, पुणे व अमरावती विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. औरंगाबाद विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. राज्यात सर्वत्र पिकांच्या वाढीस पोषक पाऊस आणि हवामान आहे.
भात पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनला फांद्या फुटत आहेत, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. लवकर पेर झालेले सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मूग व उडीद फुलोरा ते शेंगा धरणे तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहेत. बागायत कापसाला बोंडे लागली आहेत. भुईमूग फुलोऱ्यात आहे. ज्वारी व बाजरीची पोटरीच्या अवस्थेत आहे. मका, सूर्यफूल, तीळ व कारळे वाढीच्या अवस्थेत आहेत.
नाशिक, पुणे, अमरावती व औरंगाबाद विभागातील काही मोजक्याच तालुक्यांत पाऊस कमी आहे. तिथे पेरणी झालेले पीक पावसाअभावी करपत आहे. या पिकाला पावसाची गरज आहे. वाढीच्या अवस्थेतील पिकांना नत्राची गरज असल्याने शेतकऱ्यांनी युरिया देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात सर्वत्र पुरेसा युरिया उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्हा अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात ६ ठिकाणी वितरकांना युरियाचा साठा उपलब्ध करून दिला आहे. तिथून तो किरकोळ विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळेल.