संशोधनाला येणार ‘अच्छे दिन’

By Admin | Published: December 31, 2016 05:39 AM2016-12-31T05:39:21+5:302016-12-31T05:39:21+5:30

देशातील अनेक विद्यार्थी, प्राध्यापक संशोधनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जातात. संशोधनासाठी आवश्यक सोयी-सुविधा, शिष्यवृत्ती, तज्ज्ञ प्राध्यापकांअभावी

'Good day' will come to research | संशोधनाला येणार ‘अच्छे दिन’

संशोधनाला येणार ‘अच्छे दिन’

googlenewsNext

पुणे : ‘देशातील अनेक विद्यार्थी, प्राध्यापक संशोधनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये जातात. संशोधनासाठी आवश्यक सोयी-सुविधा, शिष्यवृत्ती, तज्ज्ञ प्राध्यापकांअभावी आपली विद्यापीठे मागे पडतात. हे चित्र बदलण्यासाठी ‘ग्लोबल रिसर्च इंटरॅक्टिव नेटवर्क’ या उपक्रमांतर्गत ‘उच्च शिक्षण वित्तीय एजन्सी’ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून संशोधनासाठी आवश्यक सर्व सुविधा, शिष्यवृत्तीत वाढ, प्राध्यापकांचे आदान-प्रदान अशा विविध गोष्टींसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुढील महिनाभरात या प्रक्रियेस सुरुवात होईल,’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी येथे दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११० व्या पदवी प्रदान समारंभामध्ये जावडेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर जावडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड व विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ९५ हजार ७४२ पदवी, २९४ पीएचडी आणि १०५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
जावडेकर म्हणाले, की पुढील काळात जागतिक दर्जाच्या संशोधन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. संशोधनासाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. या संशोधनाची अधिकाधिक पेटंट भारताच्या नावावर असतील. देशातील २० विद्यापीठांना जागितक दर्जाचे बनविले जाणार आहे. तसेच शैक्षणिक संस्था, शिक्षक, अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांसह विविध बाबींची गुणवत्ता सुधारणे हे आपल्यासमोर एकमेव आव्हान आहे. शिक्षणातील गुणवत्ता वाढल्याशिवाय देश प्रगती करू शकणार नाही. दरवर्षी एका विद्यार्थ्यासाठी केंद्रीय विद्यार्थ्यांमध्ये ५० हजार, नवोदय विद्यालयांमध्ये १ लाख, केंद्रीय विद्यापीठांमध्ये २ लाख, आयआयटीमध्ये ६ लाख, तर सार्वजनिक विद्यापीठांमध्ये सुमारे ५० हजार रुपये खर्च केला जातो.
येत्या काळात या खर्चाचा लेखाजोखा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पदवी मिळाली म्हणून आपले शिक्षण संपले असे नाही. ही प्रक्रिया आयुष्यभर सुरू असते. केवळ ज्ञान असून भागत नाही तर आपल्या कामात शिस्त आणि प्रामाणिकपणा हवा, असे जावडेकर यांनी नमूद केले. कुलगुरू डॉ. गाडे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला.

चांगले काम
केल्यास स्वायत्तता
आपण शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याच्या बाजूने असल्याचे सांगत जावडेकर म्हणाले, ‘‘ज्या संस्था चांगले काम करतील त्यांना अधिकाधिक स्वायत्तता दिली जाईल. मात्र, चांगले काम न दिल्यास संबंधित संस्थांवरील बंधने वाढतील. याबाबत पुढील काळात धोरण आखले जाईल.’’

सर्व पदव्या डिजिटल
विद्यापीठाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आलेली सर्व पदवी प्रमाणपत्रे डिजिटल करण्यात आली आहेत. नॅशनल अ‍ॅकॅडमिक डिपॉझिटरी (एनएडी) मध्ये या पदव्या टाकण्यात आल्या आहेत. जावडेकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यापुढील काळात सर्व पदव्या विद्यापीठामार्फत एनएडीवर टाकल्या जाणार आहेत. ‘पदव्यांबाबत विविध विवाद होतात. बोगस पदवी प्रमाणपत्र तयार केली जातात. यापुढे असे करता येणार नाही. एनएडीवर पदवी प्रमाणपत्रांची खातरजमा करता येईल,’ असे जावडेकर यांनी सांगितले.

नीलेश आंबरे याला राष्ट्रपतिपदक
संगमनेर येथील संगमनेर नगरपालिका, कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालयातील नीलेश आंबरे हा विद्यार्थी ‘दी प्रेसिडेंट आॅफ इंडिया डॉ. शकरदयाळ शर्मा सुवर्णपदका’चा मानकरी ठरला, तर कर्मवीर भाऊराव पाटील ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हर्षला गडदे हिला ‘श्रीमती नीलिमाताई पवार सुवर्णपदका’ने गौरविण्यात आले.

Web Title: 'Good day' will come to research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.