आळेफाटाला डाळिंबाला चांगला बाजारभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:30+5:302021-07-01T04:08:30+5:30
शेतकरी वर्गाला डाळिंब विक्रीसाठी सोय निर्माण व्हावी, यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने आळेफाटा उपबाजारात एप्रिल २०१६ पासून लिलाव ...
शेतकरी वर्गाला डाळिंब विक्रीसाठी सोय निर्माण व्हावी, यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने आळेफाटा उपबाजारात एप्रिल २०१६ पासून लिलाव सुरू केले. डाळिंबाचा हंगाम जून ते ऑक्टोबर पहिला टप्पा व डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च दुसरा टप्प्यात असतो. आळेफाटा उपबाजारात डाळिंबाची आवक या हंगामात चांगली होते. गुरुवार सोडून दररोज येथे डाळिंब लिलाव होतात. पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना येथील शेतकरी येथे डाळिंब विक्रीस आणतात.
आळेफाटा उपबाजारात जून महिन्याचे पहिल्या आठवड्यात सरासरी आठशे क्रेटची आवक येथे झाली होती. तर दर्जेदार डाळिंबास प्रतिवीस किलो क्रेटला ३ हजार दोनशे कमाल बाजारभाव मिळाले. यानंतर येथील डाळिंबाची आवक वाढली तसेच बाजारभावही वधारले. काल मंगळवारी चांगल्या प्रतीच्या वीस किलो क्रेटला पाच हजार शंभर असा दर मिळाला. आज बुधवारी सहा हजार तीनशे डाळिंबाचे क्रेट विक्रीस आले असल्याचे बाजार समिती सचिव रूपेश कवडे, कार्यालयप्रमुख प्रशांत महांबरे यांनी सांगितले.
डाळिंबाला सध्या चांगली मागणी असल्याने दर्जेदार डाळिंबाला चांगले दर मिळत असल्याचे आडतदार व्यापारी प्रवीण लेंडे, संजय कुऱ्हाडे, नीलेश भुजबळ, विशाल कुटे, निशिकांत डोमसे यांनी सांगितले. समाधानकारक दर मिळत असल्याचे तुकाराम दिघे या शेतकऱ्याने सांगितले. आज बुधवारी प्रतवारीप्रमाणे प्रती वीस किलो क्रेटला मिळालेले दर याप्रमाणे. एक नंबर डाळिंब ३५०० ते ४५०० रुपये, दोन नंबर डाळिंब १५०० ते ३५०० रुपये, तीन नंबर डाळिंब ८०० ते १५०० रुपये.
आळेफाटा उपबाजारातील डाळिंबाचे लिलाव.