गुडमॉर्निंग पथकाला हुडहुडी
By admin | Published: January 3, 2017 06:28 AM2017-01-03T06:28:40+5:302017-01-03T06:28:40+5:30
शिरूर तालुका पंचायत समितीअंतर्गत तालुका निर्मल ग्राम व हगणदरीमुक्तीसाठी असणाऱ्या गुडमॉर्निंग पथकाला या वर्षात हुडहुडी भरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कारेगाव : शिरूर तालुका पंचायत समितीअंतर्गत तालुका निर्मल ग्राम व हगणदरीमुक्तीसाठी असणाऱ्या गुडमॉर्निंग पथकाला या वर्षात हुडहुडी भरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिरूर तालुक्यात वर्षभरात फक्त १६ वेळा गुडमॉर्निंग पथकाने कारवाई केली आहे. या सोळा कारवायांपैकी सर्वच कारवाया नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर महिने गुडमॉर्निंग पथकाने काय कारवाई केली, याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. ३१ डिसेंबरअखेरीस जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसल्यानंतर कारवाईला जोर आला. त्यामुळे बुधवारअखेरपर्यंत तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींपैकी ६२ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. अद्यापही ३१ ग्रामपंचायती हगणदरीमुक्तीचे आव्हान प्रशासनापुढे राहिले आहे.
शिरूर तालुक्यात गुडमॉर्निंग पथकासाठी पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून, पूर्व भागतील निमोणे, तांदळी, गुणाट येथे दोन वेळा तर वडगाव रासाई, सादलगाव, इनामगाव या गावांत फक्त एकदा करवाई करण्यात आली. तालुक्याचा पश्चिम पट्ट्यात पाबळ, कवठे येमाई, टाकळी हाजी, केंदूर या गावांत दोनदा कारवाई करण्यात आली. या पथकाच्या धाडीने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे अनेक टमरेलबहाद्दर नागरिकांची बॅडमॉर्निंग झाली. या कारवाईतील नागरिकांना नोटीस, प्रबोधन असे पर्याय वापरण्यात आले. नोटबंदीचा फटका या पथकाला सहन करावा लागला. त्यामुळे आर्थिक कारवाई न करता गांधीगिरीचा वापर करण्यात आला. या पथकात विस्तार अधिकारी, संपर्क अधिकारी, प्राथमिक शाळांचे त्या भागतील शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी सहभागी असतात. साधारण २५ ते ३० जणांचे पथक असते. स्वच्छ ग्राम सुंदर ग्राम असे मानत तालुका १०० टक्के हगणदरीमुक्त करण्यासाठी या भरारी पथकाने दोन महिन्यांत चांगली कारवाई केली. नागरिकांनी गावात शौचालय बांधावे, म्हणून अनेकांना अनुदान देण्यात आले. राज्य शासनाने आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ‘स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख भेटी’ या नावाने अभियान राबविले होते. त्यामुळे राज्यातील ५९ तालुके हगणदरीमुक्त झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी आणि खेड हे चार तालुके हगणदरीमुक्त झाले असून, इंदापूर वगळता बहुतांश तालुक्यांची आकडेवारी ९० टक्क्यांच्या पुढे आहे.