आनंदवार्ता! यंदा १०६% मान्सून; कधी किती पाऊस? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 07:08 AM2024-04-16T07:08:55+5:302024-04-16T07:10:29+5:30
‘ला निनो’मुळे सरासरीपेक्षा अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/पुणे : दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘ला निना’च्या अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे. यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त आणि दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (८७ सेंमी.) १०६ टक्के असेल, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी दिली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल, याबाबत माहिती दिली. देशात ८० टक्के भागांत सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने गेल्यावर्षी ९६ टक्के पावसाचा अंदाज दिला होता.
सध्या एल निनो जात आहे आणि ला निनो येत आहे. नऊ वर्षांच्या आकडेवारीवरून ला निनोमुळे चांगला पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे. यंदाही चांगला पाऊस होईल. मान्सूनसाठी सकारात्मक स्थिती असणार आहे. - डॉ. मृत्युंजय महोपात्रा, महासंचालक, हवामानशास्त्र विभाग
कधी किती पाऊस?
- १९७१ ते २०२० पर्यंतच्या पावसाच्या सरासरीनुसार १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी ८७ सेंमी पाऊस पडतो.
- यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या तुलनेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे महोपात्रा म्हणाले.
पावसाची वर्गवारी
९६ ते १०४% सामान्य
१०५ ते ११०% सामान्यपेक्षा जास्त
९० ते ९६% सामान्यपेक्षा कमी
निवडणुकीदरम्यान वादळाची शक्यता नाही; पण उष्णतेची लाट येऊ शकते. त्याबाबत आयोगाला माहिती दिली जाईल, असे महोपात्रा यांनी सांगितले.
देशातील ८० टक्के भागात दमदार बरसणार; ४ राज्यांत कमी पाऊस
- हवामान विभागाने मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सूनच्या पावसाबद्दल स्पष्ट संकेत दिले नाहीत. हा भाग देशाचा ‘मुख्य मान्सून विभाग’ मानला जातो. येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे.
- देशभरात नैर्ऋत्य मान्सूनअंतर्गत १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान मोसमी पाऊस सरासरी १०६ टक्के पडणे अपेक्षित आहे. जम्मू - काश्मीर, लडाख, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- ईशान्येकडील आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडचा काही भाग आणि बंगालमधील गंगा खोऱ्यातही सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.