खुशखबर! नऊ महिन्यांनी कोयना परिसरातील निसर्ग पर्यटकांसाठी खुला; 'एमटीडीसी' पुनश्च सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 05:59 PM2020-12-01T17:59:07+5:302020-12-01T18:00:53+5:30
कोरोनाचे सर्व नियम आणि स्वच्छता निकष पाळून निवासस्थाने सुरू
पिंपरी : लॉकडाऊन (टाळेबंदी) नंतर कोयना अभयारण्य आणि धरण परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत या आठवड्यापासून रुजू झाले. कोरोनाचे सर्व नियम आणि स्वच्छता निकष पाळून निवासस्थाने सुरू करण्यात आल्याची माहिती एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.
टाळेबंदी शिथिल केल्यानंतर एमटीडीसीच्या पुणे विभागातील पानशेत, कार्ला, भीमाशंकर, माळशेज घाट, माथेरान, महाबळेश्वर ही निवासस्थाने सुरू करण्यात आली आहेत. पाठोपाठ कोयना अभयारण्य, धरण क्षेत्राच्या परिसरात असलेले पर्यटक निवासस्थान मंगळवारपासून (दि. १) सुरू करण्यात आली आहेत. एमटीडीसीच्या कोयना धरण परिसरात दोन निवासस्थाने असून २२ खोल्या आहेत. कॉटेज रुम्स, बंगलो, फॅमिली आणि डिलक्स रुमची सुविधा आहे. लग्नसमारंभ, लग्नपूर्व फोटो सेशन, कॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठका, निसर्गस्थळी राहून कामाची सुविधा, अशा सोयीदेखील एमटीडीसीने सुरू केल्या आहेत.
पर्यटकांना पर्यटनविषयी सुविधा, खाद्यपदार्थ माहिती, आसपासच्या निसर्गस्थळांची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम माहिती, महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजना यांची माहिती पर्यटकांना दिली जाईल. त्याचबरोबर पर्यटकांच्या समोरच त्यांना देण्यात येणाऱ्या खोल्या निर्जंतुक करून दिल्या जाणार आहेत. पुढील दोन वर्षे निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना राबविण्याचा मानस असल्याचे हरणे यांनी सांगितले.