बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी! ...अखेर शहराचा ‘अनलॉक’च्या दिशेने प्रवास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 01:19 PM2021-06-07T13:19:31+5:302021-06-07T13:19:43+5:30
दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा, सर्व दुकाने ९ ते १ वाजेपर्यंत खुली राहणार
बारामती: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेल्या बारामतीचा प्रवास आता ‘अनलॉक’च्या दिशेने सुरु झाला आहे. उद्या (मंगळवार) पासून बारामती शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. १५ जुनपर्यंत हि वेळ कायम राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. बारामतीत गेल्या २४ तासात केवळ ८ कोरोनाबाधित आढळले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून असणारा कोरोनाचा आलेख घसरण्यास सुरवात झाली आहे. एप्रिल मध्ये जवळपास दररोज ४०० च्या घरात शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित आढळण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे कोरोनाबाधितांची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लादले होते.५ एप्रिलपासून संपूर्ण बारामती बंद आहे. अखेर दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून काही वेळ का होईना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याचे सुत्रांनी सांगितले.
सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार आहेत. तर अत्यावश्यक वर्गातील दुकानांची वेळ आता वाढविण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक सेवेअंतर्गत असणारी दुकानांची वेळ यापुर्वी ११ वाजेपर्यंत होती. आता हि वेळ मंगळवारपासून ४ वाजेपर्यंत असणार आहे.
दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून व्यापार बंद होता. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण वाढली आहे. कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, सरकारी टॅक्स, वीजबिल,टेलीफोन बिल, जागा भाडे, नगरपरीषद टॅक्स आदी खर्च त्यामुळे व्यापारी हतबल झाला होता. रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. मात्र, इतर व्यवसायांना देखील कोविड नियमांच्या आणि वेळेच्या बंधनासह परवानगी देण्याची मागणीने जोर धरला. कोरोना रुग्णांची घट आणि व्यापाऱ्यांची मागणी या पार्श्वभूमीवर परवानगी मिळाली आहे.