गुड न्यूज! पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोनची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 01:45 PM2021-08-22T13:45:02+5:302021-08-22T13:45:09+5:30
पहिल्या व तिसऱ्या लाटेच्या तुलनात्मक अभ्यासावरून, पुण्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण घटत चालले
निलेश राऊत
पुणे : कोरोनाच्या पहिल्या व तिसऱ्या लाटेच्या तुलनात्मक अभ्यासावरून, पुण्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ० ते १८ वयोगटातील बाधित मुलांची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दीड टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना वर्तविण्यात आलेला सर्वाधिक धोक्याचा अंदाज, हा पुण्यातील सामुहिक प्रतिकारशक्तीने (हर्ड इम्युनिटी) हानून पाडल्याचे चित्र आहे.
पहिल्या लाटेत शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७२ हजार २९७ इतकी होती. यापैकी १९ हजार ५२० बाधित हे ० ते १८ वयोगटातील मुले होती.एकूण बाधितांच्या तुलनेत ही टक्केवारी ११.३३ टक्के होती. तर उपचाराअंती पूर्ण झालेल्यांची संख्या यात १९ हजार ४९३ इतकी होती. तर या काळात २७ मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिकच राहिले. परंतु, कोरोनामुक्तीचे प्रमाणही त्यातुलनेत अधिकच होते. दुसऱ्या लाटेत शहरात एकूण २ लाख ८८ हजार ३०६ जण बाधित झाले. यापैकी २८ हजार ४८२ बाधित हे ० ते १८ वयोगटातील मुले होती. एकूण बाधितांच्या तुलनेत ही टक्केवारी ९.८८ टक्के आहे. तर उपचाराअंती पूर्ण झालेल्या मुलांची संख्या ही २८ हजार १६५ इतकी असून, दुसऱ्या लाटेत २५ मुलांचा मृत्यू झाला.
शहरात पहिल्या लाटेत या वयोगटातील मृत्यूदर हा ०.१४ टक्के होता. तर तोच दुसऱ्या लाटेत ०.००९ टक्के इतका खाली आला आहे. सध्या शहरातील विविध रूग्णालयांमध्ये १८ लहान मुलांवर उपचार चालू असून, शहरातील सक्रिय कोरानाबाधित मुलांची संख्या ही २९२ इतकी आहे.
डेल्टा प्लसचे रूग्ण पण कोरोनामुक्त
जगातील काही देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली असून, ‘डेल्टा प्लस’ कोविड रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात हा कोरोना विषाणूमधील जनुकीय बदल मोठ्या प्रमाणात आढळून आलेला नाही.शहरात आत्तापर्यंत १ तर जिल्ह्यात ५ असे सहा रूग्ण डेल्टा प्लसची लागण झालेले आहेत. परंतु, पुण्यात आढळलेले हे सर्व रूग्ण आजमितीला कोरोनामुक्त झाले आहेत. ससून रूग्णालय व एनआयव्ही मध्ये कोरोनाबाधित रूग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेतले असता, यामध्ये हे रूग्ण आढळून आले़ आयएमएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण बाधितांपैकी काही प्रमाणात नमूने तपासणीसाठी घेतले जातात़ त्यानुसार आत्तापर्यंत ससूनमधून १० हजार व शहरातील बाधितांपैकी १ हजार जणांचे नमूने डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी घेण्यात आले़ यामध्ये ससूनमधील ६ जण हे डेल्टा प्लसची बाधा असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले़ परंतु, हे अहवाल येईपर्यंत सदर रूग्णांनी या विषाणूवरही मात केली होती़
पुण्यात तिसऱ्या लाटेचा धोका कमी
पुणे शहरात शनिवारपर्यंत ( २० ऑगस्ट) कोरोनाबाधितांची सरासरी टक्केवारी ही २.६७ टक्के (पॉझिटिव्हिटी रेट) इतकी खाली आली आहे. तसेच दैनंदिन मृत्यू हे ५ वर आले असून, यामध्ये ९९ टक्के मृत्यू हे कोरोनासह अन्य आजार असलेल्या व वय वर्षे ७० च्या पुढीलच आहेत़ त्यामुळे सध्यातरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका शहराला खूपच कमी असल्याचे सकारात्मक चित्र मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे दिसून येत आहे. आजमितीला शहरात २८ लाख १८ हजार २१२ जणांचे लसीकरण झाले असून, यापैकी २० लाख ७१ हजार ६१० जणांचा पहिला डोस झाला असून, ७ लाख ४६ हजार ६०२ जणांचे दोन्ही डोस झाले आहेत.