गुड न्यूज! अखेर पुणे जिल्हयात निर्बंध शिथिल; दुकानं, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:11 PM2021-08-17T14:11:58+5:302021-08-17T14:12:13+5:30
मॉल साठी दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच देणार प्रवेश
पुणे : शहरी भागासोबतच आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर हा पाच टक्क्यांहून कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायती नगरपालिका नगरपरिषद आणि हद्दीतील सर्व दुकाने, हॉटेल, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी काढले आहेत.
राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले आदेश आणि नियमावली, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ग्रामीण क्षेत्रांमध्ये निर्बंध शिथिल केल्याची माहिती दिली. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर गेल्या काही आठवड्यापासून 5 टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. कोरोना निर्बंधातून सूट देण्यात आली नव्हती. मात्र, सध्या ग्रामीणचा कोरोना बाधितदर 4.9 टक्यांवर आल्याने निर्बंधातून सुट मिळाली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर ग्रामीण भागाला हा दिलासा मिळाला आहे. नगरपालिका नगरपरिषद आणि ग्रामपंचायत क्षेत्रात असणाऱ्या मॉल साठी दोन लसीचे डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉल मध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच राज्य शासनाने लागू केलेले कोरोना विषयक सर्व नियम लागू राहणार आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील सर्व हॉटेल, बार 50 टक्के क्षमतेसह सर्व रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेलमध्ये रात्री 9 पर्यंत ऑर्डर घेता येणार आहे. हे करत असताना कोरोना विषय नियमावलीचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी दुकानदार आणि हॉटेल मालकांवर देण्यात आली आहे.