रसिकांसाठी खुशखबर! 'सवाई' चा मुहूर्त ठरला; यंदाचा महोत्सव १४ ते १८ डिसेंबर दरम्यान रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 03:34 PM2022-10-07T15:34:59+5:302022-10-07T15:35:20+5:30
मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न होणार
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सवाई महोत्सव होऊ शकला नाही. यंदाच्या महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येईल. याआधीचा महोत्सव डिसेंबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता.
सरकारच्या नियमात वारंवार बदल होत असल्याने महोत्सव झाला होता रद्द
आर्य संगीत प्रसारक मंडळाने जन्मशताब्दी वर्षाची सांगता ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दि. २ ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत मुकुंदनगर येथील कटारिया प्रशालेच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार होता. राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले होते. त्यावेळी राज्य शासनाने बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ५० टक्के तर खुल्या मैदानातील आयोजनासाठी 25 टक्के क्षमतेची मर्यादा निश्चित केली होती. मात्र २५ टक्के क्षमतेमध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करणे शक्य नसल्याची भूमिका मंडळाने घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रपटगृहे, नाट्यगृहांसह इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांना शंभर टक्के क्षमतेने कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्याचे जाहीर केले आणि त्यामुळे चालू महिन्याच्या अखेरीस महोत्सव आयोजित करण्याच्या हालचाली आयोजकांनी सुरू केल्या होत्या.
मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा अवघ्या काही तासाच हवेत विरली. त्यामुळे आयोजकांच्या आनंदावर विरजण पडले. परंतु, पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षातच महोत्सवाचे आयोजन व्हावे याकरिता सवाई गंधर्व रसिक मंडळाने ५० टक्के क्षमतेच्या उपस्थितीत शासनाने आयोजनास परवानगी द्यावी याकरिता मोहीम राबविली होती. अखेर सरकारच्या नियमात वारंवार बदल होत असल्याने महोत्सव रद्द करण्यात आला होता.