भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:10 PM2024-10-08T22:10:24+5:302024-10-08T22:11:38+5:30

१०० कोटी रुपये किमतीची २४ एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग करण्यात आली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला.

Good News for Devotees 24 Acre Land for Nimgaon Khandoba Area Development Govt decision issued  | भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 

भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 

Khandoba Mandir ( Marathi News ) : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदिर देवस्थान परिसराचा रोपवे व अन्य पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यात येणार असून तेथील आध्यात्मिक, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यासाठी  परिसरातील सुमारे शंभर कोटी रुपये किमतीची २४ एकर शासकीय गायरान जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग करण्यात आली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. राज्यातील आणि राज्याबाहेर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निमगाव खंडोबा देवस्थानाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या महसूल व वन विभागाने आज जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मौजे निमगाव येथील गट क्रमांक १३५ मधील १४ हे. ४० आर. गायरान आणि शासकीय जमीन रोपवे व सार्वजनिक सुविधांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे मोफत वर्ग करण्यात आली आहे. जमिनीचा ताबा घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर सुरु करणे तसेच या भागात वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. निमगाव खंडोबा देवस्थान प्राचीन, ऐतिहासिक महत्वाचे आध्यात्मिक स्थान असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आणि प्रयत्नशील होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मौजे निमगाव येथील २४ एकर शासकीय गायरान जमीन निमगाव खंडोबा मंदीर देवस्थान परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी आला. 

दरम्यान, हा निर्णय जाहीर झाल्याने राज्यातील तसेच राज्याबाहेरील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या निर्णयामुळे मौजे निमगाव खंडोबा देवस्थान परिसराच्या विकासाला लवकरच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Good News for Devotees 24 Acre Land for Nimgaon Khandoba Area Development Govt decision issued 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे