पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील पाणी कपात मागे, पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
By निलेश राऊत | Published: July 29, 2023 01:16 PM2023-07-29T13:16:11+5:302023-07-29T13:16:21+5:30
पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
पुणे : खडकवासला धरण साखळीमध्ये दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात मुबलक वाढ झाली आहे. सध्या या धरण साखळीमध्ये २१ टीएमसीच्यावर पाणीसाठा गेल्याने, पुणे शहरात आठवड्यातून एकदा महापालिकेकडून केली जाणारी पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये शनिवारी सकाळी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पाटील यांचे विशेष अधिकारी राजेंद्र मुठे, महापालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरूध्द पावसकर, अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी, पाटबंधारे विभागाच्या अभियंता श्वेता कुऱ्हाडे आदी अधिकारी उपस्थित होते.
जुलै महिन्यात पुरेसा पाऊस पडल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी जुलै महिन्यात जेवढा पाणीसाठा होता तेवढाच पाणीसाठा सध्या उपलब्ध असल्याने पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली. दरम्यान सहा आठवड्यानंतर पुन्हा उपलब्ध पाणीसाठा पाहून आढावा बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेकडून शहरात १८ मे पासून आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात होता. ३० जून रोजी खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ ४.७० टीएमसी पाणीसाठा होता. पुरेसा पाऊस न झाल्याने शहरातील पाणी कपात महापालिकेकडून कायम ठेवण्यात आली होती. जुलै महिन्यात मात्र धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांमध्ये मिळून २१.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यातच पावसाळ्याचे आणखी दोन महिने बाकी असल्याने, शेतीच्या व शहरासाठी आवश्यक पाण्याचे नियोजन करून शहरातील पाणी कपात मागे घेण्यात आली आहे.