रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते हरंगुळ, कोल्हापूरसह तीन गाड्यांना मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 08:42 AM2024-07-05T08:42:44+5:302024-07-05T08:43:15+5:30
पुणे-कोल्हापूर विशेष गाडी नं. ०१०२३ आणि ०१०२४ या दोन्ही गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या. वाढत्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या दोन्ही गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत...
पुणे : गर्दीचा हंगाम संपला तरी रेल्वेला प्रवाशांची गर्दी वारंवार वाढत आहे. त्यामुळे पुणे विभागातून हंगामी काळासाठी धावणाऱ्या पुणे-हरंगुळ, पुणे-कोल्हापूर आणि सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस या तीन गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना माेठा दिलासा मिळाला आहे.
पुणे-कोल्हापूर विशेष गाडी नं. ०१०२३ आणि ०१०२४ या दोन्ही गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या. वाढत्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या दोन्ही गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत. यामुळे पुणे-कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीचे ठरणार आहे.
- पुणे-हरंगुलदरम्यान धावणारी दैनिक विशेष गाडी नं ०१४८७ आणि ०१४८८ या दोन्ही गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या. परंतु, वाढत्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या दोन्ही गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत. यामुळे धाराशिव, लातूरला जाणाऱ्या प्रवाशांना सोय हाेणार आहे.
- सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २५ जूनपर्यंत दर मंगळवारी धावत होती. आता गाडी नं. ०१४३५ सोलापूर- एलटीटी आणि गाडी नं ०१४३६ एलटीटी ते सोलापूर साप्ताहिक विशेष या दोन्ही गाड्यांची कालावधी वाढवण्यात आला असून, या दोन्ही गाड्या २५ सप्टेंबरपर्यंत नियमित वेळेनुसार धावणार आहेत.
या तीनही गाड्यांच्या दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नसून, विशेष शुल्कावर विशेष गाड्यांचे तिकिट बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू आहे.