सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीटंचाई पासून मुक्तता, उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 01:55 PM2024-05-10T13:55:39+5:302024-05-10T13:55:56+5:30
सोलापूर शहर, भीमा नदी काठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे
इंदापूर : भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळमो-यातून पंधराशे क्यूसेस क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बाब असली तरी आधीच वजा ४५ टक्के पाणी उरलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा ६० टक्क्यांपर्यंत खालावला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ही उजनी धरणाच्या इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी ठरणार आहे.
सोलापूर शहर, भीमा नदी काठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यातून हे पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाच्या अधिका-यांनी दिली.
एकंदर साडेपाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. दि.२० मे पर्यंत हे पाणी सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र भीषण पाणीटंचाई, जागोजाग कोरडे पडलेले भीमा नदीचे पात्र यामुळे तीव्र उन्हाळा जमिनीत किती पाणी मुरवेल, किती पाण्याचे बाष्पीभवन होईल यावर पाण्याच्या प्रवासाचा कालावधी अवलंबून असणार आहे. हे दिव्य पार केल्यानंतर उपलब्ध झालेले पाणी सोलापूर शहराला पुढील पन्नास दिवस काटकसरीने पुरवावे लागणार आहे. या सा-या घडामोडींमध्ये इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी योजनांच्या तोंडचे पाणी पळणार आहेच, या खेरीज परिसरातील तळ गाठलेल्या विहिरी देखील कोरड्या पडण्याची शक्यता आहे.