विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता विद्यापीठाच्या कॅम्पसमधून करता येईल ‘ग्रॅज्युएशन’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:09 PM2022-06-27T12:09:34+5:302022-06-27T12:12:04+5:30
कमी खर्चात मिळणार दर्जेदार शिक्षण...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात काेर्सेस करण्यासाठी यापूर्वी किमान ग्रॅज्युएशन हाेणे आवश्यक हाेते. विद्यापीठाने आता चक्क बारावीनंतरच कॅम्पसमधून अनेक पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कमी खर्चात दर्जेदार शिक्षण घेऊन उत्तम करिअर घडवता येणार आहे.
इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने बारावीनंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेअंतर्गत करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.
यात घेता येणार शिक्षण
- इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स अंतर्गत बीएस्सी, ब्लेंडेड इन फिजिक्स, केमिस्ट्री, एन्व्हायर्नमेंटल सायन्स, अर्थ सायन्स हे अभ्यासक्रम आहेत. यासाठी विद्यापीठाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठाशी करारही केला आहे.
- बायाेटेक्नाॅलाॅजी विभागातून ५ वर्षांचा एकत्रित एमएससी बायोटेक्नॉलॉजी (आयबीबी विभाग) हा अभ्यासक्रम आहे. यामधून तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित ‘बीएस्सी इन थ्री डी ॲनिमेशन अँड व्हीएफएक्स’ हा पदवी अभ्यासक्रम व प्रमाणपत्र अभ्यासक्रमही आहे.
- ‘बीटेक इन एव्हिएशन’ हा पदवी अभ्यासक्रमही विद्यापीठात आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रोडक्शन ग्राफिक डिझाइन, प्रोडक्शन यूआय डिझाइन, प्रोफेशनल व्हिज्युअल इफेक्ट आदींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
जुलै महिन्यात हाेणार प्रवेश परीक्षा
सर्व अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती, त्यासाठीची प्रवेश परीक्षा, प्रवेश क्षमता, संबंधित विभाग आदींची माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावर देण्यात आली आहे. सध्या विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, जुलै महिन्यात प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.