पुण्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी! पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 09:30 PM2022-12-05T21:30:38+5:302022-12-05T21:31:06+5:30
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना सूचना
पुणे : एसटी महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपी बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला होता. मात्र ही बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना सोमवारी दिल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. संप सुटल्यानंतरही पीएमपी ची ग्रामीण भागातील सेवा सुरू होती. यामुळे एसटी महामंडळाने पीएमपी प्रशासनाला पत्र पाठवत आमच्या सेवा पूर्ववत झाल्या असल्याचे सांगितले होते, तसेच ग्रामीण मार्गांवरील बससेवा बंद करावी; आणि आपला उत्पनाचा स्त्रोत पुन्हा देण्याची विनंती पीएमपी प्रशासनाकडे केली होती.
या पत्राच्या अनुषंगाने पीएमपी प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपी बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. त्याची दखल घेऊन पीएमपीचे संचालक ओमप्रकाश बोकोरिया यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या.