Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर! राज्यात मॉन्सून दाखल, पुढील ३,४ दिवस पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Published: June 6, 2024 02:32 PM2024-06-06T14:32:49+5:302024-06-06T14:33:39+5:30
गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदवार्ता असून, मॉन्सून राज्यात दाखल झाला आहे. आज (दि.६ जून) गुरूवारी मॉन्सून कोकणात आला आहे त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे. तसेच सोलापुरात देखील तो आला असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती. केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता. त्यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटकात काही काळ थांबला होता. आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. हा मॉन्सून रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आजपासून पुढील तीन-चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी आणि शुक्रवारी (दि.७) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरूवारी तर, शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.