खुशखबर..! वाहतूक नियम पाळणाऱ्यांना मिळणार ' गिफ्ट कुपन '
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 01:47 PM2019-06-14T13:47:31+5:302019-06-14T13:52:09+5:30
लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे़.
पुणे : दुचाकी व चारचाकी वाहन चालविणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेने अभिनव आभार योजना सुरू केली आहे़. सर्व प्रकारचे वाहतूक नियमांचे पालन करतात़. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वाहतूक नियम मोडल्याचे चलन नाही, अशा वाहनचालकांना प्रोत्साहन म्हणून १३५ नामांकित हॉटेल आणि दुकानांमध्ये १० टक्के किंवा त्यांच्या इच्छेनुसार खरेदीवर सूट देण्याचे कुपन (व्हाऊचर) योजना सुरू केली आहे़. या योजनेअंतर्गत गेल्या दोन दिवसांत सुमारे दीडशे वाहनचालकांना व्हाऊचर देण्यात आले आहे़.
याबाबतची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली़. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. यासाठी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी मोहीम सुरू केली असून, ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे. अनेकदा अशा कारवाईवेळी अडवलेल्या वाहनचालकावर कुठल्याही प्रकारचे चलन प्रलंबित नसते. तसेच त्याच्याकडे हेल्मेट, लायसन्स, गाडीचे आवश्यक कागदपत्रेही असतात. अशाप्रकारे सर्व वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना व्हाऊचर गिफ्ट देऊन कौतुक करण्यात येत आहे. लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले़ यासाठी शहरातील सुमारे १३५ नामांकित दुकानदार स्वत:हून पुढे आले आहेत.
ही योजना ऑनलाइन पद्धतीने तयार करण्यात आली आहे. वाहनचालकाला अडविल्यानंतर, त्याच्याकडे गाडीची आवश्यक कागदपत्रे असली, तर त्याला एक क्रमांक त्याच्या मोबाईल नंबरवर पाठविण्यात येईल.
........
असे मिळणार वाहनचालकांना कुपन
हा क्रमांक म्हणजेच व्हाऊचर असून, यावरून संबंधित वाहनचालकाला शहरातील १३५ हॉटेल, दुकानांमध्ये वस्तू खरेदीवर सूट मिळणार आहे. वस्तू खरेदीच्या एकूण बिलावर १० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. कुपन मिळाल्यानंतर, पुढील एक महिन्यात त्याचा वापर न केल्यास ते बाद होणार असल्याचे सांगण्यात आले़.
............