गुड न्यूज! अखेर बर्ड फ्लू हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:55 PM2021-03-13T20:55:33+5:302021-03-13T21:00:57+5:30

नंदूरबार अमरावती वगळता राज्यातून बर्ड फ्लू हद्दपार पशुसंवर्धन विभाग: प्रयोगशाळेतून इतरत्रचे नमुने निगेटिव्ह

Good news! No more bird flu cases in state. | गुड न्यूज! अखेर बर्ड फ्लू हद्दपार

गुड न्यूज! अखेर बर्ड फ्लू हद्दपार

Next

 महिनाभरापुर्वी कोरोना विषाणूच्या बरोबरीनेच प्रादुर्भाव करत असलेल्या बर्ड फ्लू या पक्ष्यांमधील साथीच्या आजाराचा प्रभाव आता बराच ओसरला आहे. नंदूरबार अमरावती हे दोन जिल्हे वगळता राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमधील मृत पक्ष्यांचे नमुने आता भोपाळ प्रयोगशाळेतून निगेटिव्ह निष्कर्षाचे येत आहेत.
हे दोन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये पाळीव पक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी यांच्यात अकस्मात मृत्यूचे प्रमाण एकदम कमी झाले आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. महिनाभरापुर्वी हे प्रमाण बरेच होते. त्यातही कावळे, पोपट तसेच पाळीव कोंबड्या फार मोठ्या प्रमाणावर संसर्गित झाल्या होत्या. मात्र या जिल्ह्यांमध्ये आता ही साथ पुर्णपणे आटोक्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.  अकस्मात एकदम जास्त मृत्यू होत नाहीत, व जे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात त्यांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.  
नंदूरबार व अमरावतीमध्ये ही साथ ओसरण्याचे अजूनही चिन्ह नाही. आतापर्यंत तिथे तब्बल ८ लाख ९८ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. अजूनही तिथे कोंबड्यांमध्ये अकस्मात मृत्यूचे प्रमाण बरेच आहे. ते नमुने तपासणीसाठी भोपाळला प्रयोगशाळेत पाठवले की त्याचे अहवाल पॉझेटिव्ह (बर्ड फ्लू आहे) येत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने तिथे काळजी घेण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले की या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुक्कुट पालनाचा (पोल्ट्री) व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या कोंबड्यांच्या शेड पाणवठा असलेल्या ठिकाणी आहेत. तिथे स्थलांतरीत पक्षी येतात. त्यांच्याकडून या कोंबड्यांना संसर्ग होतो. नियमाप्रमाणे संसर्गित कोंबडी सापडली की लगेचच त्याच्या १ किलोमीटर परिघातल्या पोल्ट्री फार्ममधील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येतात. दोन्ही जिल्ह्यांमध्ये संसर्गित पक्षी सापडण्याचे प्रमाण जास्त असल्याने आता साथ आटोक्यात आणण्यासाठी तिथे लक्ष केंद्रीत केले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

स्थलांतरीत पक्षी पाणवठ्यांवर येतात. ते आता मोठ्या संख्येने परत जाऊ लागले आहेत. नंदूरबार, अमरावतीमध्येही येत्या काही दिवसांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण एकदम कमी होईल. तरीही पोल्ट्री फार्म चालकांनी आपले पक्षी अन्य पाळीव किंवा स्थलांतरीत पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाहीत, त्यांची विष्ठा किंवा पंख वगैरे पोल्ट्रीत जाणार नाही याची काळजी घेणे अजूनही गरजेचे आहे.
डॉ. धनंजय परकाळे- अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग 

 

 

 

Web Title: Good news! No more bird flu cases in state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.