पुणेकरांसाठी खुशखबर ; नव्या वर्षात पीएमपीचा प्रवास स्वस्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:03 PM2019-12-23T21:03:26+5:302019-12-23T21:05:25+5:30
नवीन वर्षामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रशासनाने पंचिंग पासच्या दरात ४० ते १०० रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना २२ दिवसांच्या दर आकारणीमध्ये संपुर्ण महिन्याचा प्रवास करता येणार आहे.
पुणे : नवीन वर्षामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रशासनाने पंचिंग पासच्या दरात ४० ते १०० रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना २२ दिवसांच्या दर आकारणीमध्ये संपुर्ण महिन्याचा प्रवास करता येणार आहे.
पीएमपीचा पंचिंग पासद्वारे एका ठराविक मार्गावरच प्रवास करता येतो. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पुर्वीचा २२ दिवसांच्या पासची आकारणी २४ दिवसांची केली होती. या निर्णयाला प्रवासी संघटनांनी जोरदार विरोध केला होता.
पंचिग पासचे दर वाढल्यानंतर प्रवाशांची संख्याही रोडावल्याचा दावा संघटनांनी केला होता. काही अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा पंचिंग पाससाठी २४ दिवसांऐवजी २२ दिवसांची दर आकारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पासच्या दरामध्ये ४० ते १०० रुपयांपर्यंत कपात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी दि. १ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी सासवड, उरळीकांचन व राजगुरूनगर या तीन ठिकाणी दि. २४ डिसेंबरपासून पुर्ववत पास विक्री केंद्र सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना याठिकाणीही पास उपलब्ध होणार आहेत. हे पास पुर्ववत सकाळ सत्रामध्ये देण्यात येणार आहेत. सध्या महामंडळाकडून ४० पास विक्री केंद्रांद्वारे प्रवाशांना पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पंचिंग पासचे दर कमी करण्यात आल्याने या पासला प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.