पुणेकरांसाठी खुशखबर : चारही धरणे भरण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 01:05 PM2019-08-02T13:05:13+5:302019-08-02T13:26:38+5:30
दाच्या वर्षी झपाट्याने खालावलेली खडकवासला साखळीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली असून सध्या ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला असून वर्षभराच्या पाण्याची सोय झाली असे म्हणण्यास हरकत नाही.
पुणे : यंदाच्या वर्षी झपाट्याने खालावलेली खडकवासला साखळीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली असून सध्या ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला असून वर्षभराच्या पाण्याची सोय झाली असे म्हणण्यास हरकत नाही. दुसरीकडे मुळशी धरणही ९३टक्के भरले आहे.
यंदा तीव्र उन्हाळा आणि बाष्पीभवन यांच्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासलाधरण साखळीतील पाण्याच्या पातळी सातत्याने कमी होत होती. अक्षरश: पुणेकरांचा घसा कोरडा पडावा इतके पाणी कमी झाल्याने शहरावर पाणी कपात करण्याची वेळ आली होती. मात्र उशिरा का होईना पण दमदार पावसाच्या आगमनाने हा फरक भरून काढला असून मागील वर्षीपेक्षाही जास्त पाणीसाठ्याची नोंद झाली आहे
सध्या खडकवासला धरणात १. ९७ टीएमसी (१००%), पानशेत धरणात १०.५७ टीएमसी (९९.२७%), वरसगाव धरणात १०.६० टीएमसी (८२. ७१%), आणि टेमघर धरणात २.७१ टीएमसी (७३.१९%) इतका पाणीसाठा आहे. हा एकूण पाणीसाठा ८८.७२ टक्के इतका असून मागील वर्षी हा साठा ८६. ६७ टक्के इतका होता. एकूणच धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पर्यटकांनीही गर्दी केली आहे. शनिवार-रविवार तर नागरिक हमखास या भागात पर्यटनासाठी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
मुळशी धरण ९३% भरले असून आहे. त्या भागातही पावसाचा जोर वाढला असल्याचे दिसून येत आहे . या धरणातून आज कोणत्याही क्षणी विसर्ग चालू करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीकाठची गावे, वाड्या ,वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. वीजेवरील मोटारी, इंजिने शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जिवीत वा वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन टाटा पॉवर प्रशासनाने कळवले आहे.