पुणेकरांसाठी खुशखबर ; आता संभाजी पुलावरून धावणार दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:33 PM2019-10-16T18:33:26+5:302019-10-16T18:37:36+5:30
मागील १५ वर्षांपासून दिवसा फक्त चारचाकीसाठी खुला असणाऱ्या संभाजी उर्फ लकडी पुलावर आता २४ तास दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे.
पुणे : मागील १५ वर्षांपासून दिवसा फक्त चारचाकीसाठी खुला असणाऱ्या संभाजी उर्फ लकडी पुलावर आता २४ तास दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. अखेर पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांचा विचार करून हा निर्णय घेतल्याने दुचाकीस्वारांनी आनंद व्यक्त केला आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी या पुलावरची दुचाकींची वाहतूक दिवसा बंद करण्यात आली होती. लकडी पुलाला समांतर असणारे पूना हॉस्पिटजवळील यशवंतराव चव्हाण पूल आणि झेड ब्रिज बांधून झाल्यावरही सवयीनुसार सर्व दुचाकीस्वार फक्त लकडी पुलाचा वापर करत. त्याचा तोटा म्हणजे या रस्त्यावर खूपदा वाहतूक कोंडी होत असे. अखेर सकाळपासून ते रात्री नऊ वाजे[पर्यंत या पुलावरून दुचाकी वाहतुकीस मनाई करण्यात आली. त्याकरिता दोनही बाजूंनी वाहतूक पोलीस उभे असत. त्यामुळे नेहमी त्या रस्त्यावरून जाणारे पुणेकर चुकूनही दुचाकी असेल तर लकडी पुलाचा वापर करत नसत. आता वाहतूक पोलिसांनी निर्णय घेतल्यावर या पुलावरून पुन्हा सर्व प्रकारची वाहतूक सुरु होणार आहे.