पुणेकरांसाठी खुशखबर! जानेवारी अखेरीस धावणार दोन्ही मेट्रो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:44 PM2022-01-04T14:44:12+5:302022-01-04T14:51:53+5:30
महामेट्रोच्या वतीने दोन्ही शहरांमधील प्राधान्य मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे...
पुणे: जानेवारीच्या अखेरीस पुणेकर व पिंपरी-चिंचवडकरांचे (pune pimpri chinchwad metro) पाय मेट्रोला लागतील. महामेट्रोच्या वतीने दोन्ही शहरांमधील प्राधान्य मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून उद्घाटनाची वेळ जाहीर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या तारखेवर उद्घाटनाची वेळ अडली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी- चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या दोन मेट्रो मार्गांचे काम आता ९५ टक्के पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर दोन्ही मार्ग ऊदघाटनासाठी सज्ज असतील अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी दिली.
ऑनलाईन संवाद साधत दीक्षित यांनी स्थानकातील सुविधा, मेट्रोचे डबे तसेच अन्य अनेक बाबतीत पुणे मेट्रो जागतिक मेट्रोशी स्पर्धा करत असल्याचा दावा केला. पुणेकरांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा पुणे मेट्रोकडून मिळतील असे त्यांनी सांगितले. प्रकल्प संचालक अतूल गाडगीळ हे प्रत्यक्ष तर जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे हे ऑनलाईन सहभागी होते.
फक्त तिकिटांमधून मिळणारे ऊत्पन्न तोकडे असेल हे लक्षात घेऊन महामेट्रोने आधीपासूनच ऊत्पन्नाचे मार्ग शोधलेत. वनाज, स्वारगेट या ठिकाणी मोठी व्यापारी संंकूले बांधण्यात येत आहेत. राज्य सरकारने टीओडी (ट्रांझिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) कायदा करून महामेट्रोला मुद्रांक शुल्कातील काही वाटा मिळेल अशी तरतुद केली असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. याशिवाय स्थानकांचे ब्ँडिंग, त्यावरील जाहिराती यातूनही मेट्रोला चांगले आर्थिक ऊत्पन्न मिळेल असे ते म्हणाले.
मेट्रोचा तिकिट दर किमान १० रूपये व कमाल ५० रूपये असेल. प्रवाशांना मेट्रोपर्यंत येणे सुलभ व्हावे यासाठी स्थानकांच्या खालील रिकाम्या जागेत बस बे तसेच रिक्षा थांबे असणार आहेत. स्थानकात जाण्यायेण्यासाठी दोन्ही बाजूस जिने, सरकते जिने व लिफ्ट अशा तीन सुविधा सुरू झाल्या आहेत. पहिल्या मजल्यावर तिकिट घर तसेच स्टॉल्स असतील. दुसर्या मजल्यावर प्लॅटफार्म. त्याची लांबी १४० मीटर, रूंदी २१ मीटर आहे. संपूर्ण स्थानक वातानुकूलीत असेल. सौर ऊर्जेवर त्याचे कामकाज चालेल.