रसिकांसाठी खुशखबर! पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्वने होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 05:54 PM2021-12-13T17:54:07+5:302021-12-13T17:54:47+5:30
पंंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्याची मागणी रसिकांसह कलाकार मंडळींकडून सातत्याने होत होती
पुणे : कोरोनामुळे सलग दोन वर्षे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवापासून रसिक वंचित राहिले. ’भारतरत्न’ पं. भीमसेन जोशी यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असूनही शासनाच्या खुल्या मैदानातील कार्यक्रमांच्या २५ टक्के क्षमतेच्या मर्यादेमुळे महोत्सव करण्याबाबत आयोजकांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु, पंंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करण्याची मागणी रसिकांसह कलाकार मंडळींकडून सातत्याने होत होती. पंडितजींचे जन्मशताब्दी वर्ष हे दि.४ फेब्रुवारी २०२२ ला संपत आहे.
त्यामुळे आर्य संगीत प्रसारक मंडळाने जन्मशताब्दी वर्षाची सांगता ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. २ ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत मुकुंदनगर येथील कटारिया प्रशालेच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे. त्यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाने बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ५० टक्के तर खुल्या मैदानातील आयोजनासाठी 25 टक्के क्षमतेची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र २५ टक्के क्षमतेमध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करणे शक्य नसल्याची भूमिका मंडळाने घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रपटगृहे, नाट्यगृहांसह इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांना शंभर टक्के क्षमतेने कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्याचे जाहीर केले आणि त्यामुळे चालू महिन्याच्या अखेरीस महोत्सव आयोजित करण्याच्या हालचाली आयोजकांनी सुरू केल्या होत्या. मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा अवघ्या काही तासाच हवेत विरली. त्यामुळे आयोजकांच्या आनंदावर विरजण पडले. परंतु, पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षातच महोत्सवाचे आयोजन व्हावे याकरिता सवाई गंधर्व रसिक मंडळाने ५० टक्के क्षमतेच्या उपस्थितीत शासनाने आयोजनास परवानगी द्यावी याकरिता मोहीम राबविली. अखेर आर्य संगीत प्रसारक मंडळीने महोत्सव फेब्रुवारीमध्ये आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कलाकारांसह ’कानसेनां’ मध्ये चैतन्य पसरले आहे.
''भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. महोत्सव करणे हे आमचे कर्तव्य आहे. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल असे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.''