खूशखबर! टेमघरची गळती आली आटोक्यात : यंदा करणार शंभर टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 08:00 AM2019-07-14T08:00:00+5:302019-07-14T08:00:06+5:30
अवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले.
- विशाल शिर्के-
पुणे :दोन वर्षांपूर्वी गळतीमुळे राज्यभर गाजलेल्या टेमघर धरणामधे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येणार आहे. पाणीबाणीच्या काळामधे हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. धरणातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाल्याने गळती आटोक्यात आल्याने, धरणात शंभरटक्के पाणी साठविण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पावणेचार अब्ज घनफूट पाणी (टीएमसी) पाणी उपलब्ध होईल. पुणे शहराची साडेतीन महिन्यांची तहान यात भागू शकते.
मुळशी तालुत्यातील मुठा गावाजवळ मुठा नदीवर हे धरण बांधण्यात आले असून, २००१ सालापासून त्यात पाणी साठविले जात आहे. अवघ्या १५ वर्षांमधेच धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी समोर आले. धरणाला धोका पोहचतो की, काय असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणी जलसंपदातील तत्कालिन अधिकाऱ्यांबरोबरच संबंधित कंत्राटदार कंपनीतील जबाबदार व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धरणाच्या डागडुजीसाठी सरकारने तत्काळ निधी मंजुर केला. गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या भेगा बुजविण्याचे आणि धरणाला मजबुती आणण्याचे काम सुरु आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे धरणात दोन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात आला नाही. खडकक वासला धरण साखळीतील टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता ३.८१ टीएमसी असून, त्या पैकी ३.७० टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या पैकी निम्मा साठा धरणात करण्यात आला होता. कामासाठी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच धरण रिकामे करण्यात आले होते.
ग्राऊटींड (भेगा बुजविणे) आणि पॉलिफायबर रिइन्फोर्स शॉर्र्टफिट या तंत्राच्या आधारे भेगा बुजविणे आणि धरणाला मजबुती देण्याचे काम करण्यात येत आहे. यातील भेगा बुजविण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून, पॉलिफायबर तंत्रज्ञानाने करण्यात येणारे मजबुतीचे काम १० टक्के झाले आहे. भेगा बुजविण्याचे मुख्य काम बहुतांश प्रमाणात झाले असल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यात येईल. पुढील वर्षी मॉन्सून पूर्वी उरलेले कामही होईल, असे जलसंपदाच्या अधिकाºयांनी सांगितले.
---
काय आहे ग्राऊटींग
धरणातील भेगा बुजविण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटमधे प्लाय अॅश, सिलिका, प्लॅस्टीसायझर आणि या सर्वांना एकत्रित बांधण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा वापर केला जातो. उच्चदाबाने हे मिश्रण भेगांमधे भरले जाते. या मुळे गळती थांबते. केंद्रीय पॉवर अॅण्ड रिसर्च स्टेशन आणि जलसंपदा विभााने या कामाचा आरखडा बनिवला असून, त्याच्या चाचण्या देखील घेतल्या आहेत.