Alphonso Mango: गोड बातमी! फळांचा राजा स्वस्त झाला; हापूस आंबा एक डझन ४०० रुपये
By अजित घस्ते | Updated: April 15, 2025 15:35 IST2025-04-15T15:31:02+5:302025-04-15T15:35:00+5:30
काही दिवसात हापूसची आवक वाढणार असून, दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे

Alphonso Mango: गोड बातमी! फळांचा राजा स्वस्त झाला; हापूस आंबा एक डझन ४०० रुपये
पुणे: कोकणातील हापूस आंब्यांचा हंगाम बहरला आहे. मार्केटयार्डातील फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसची आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरातही घट झाली आहे.
येत्या काही दिवसात हापूसची आवक वाढणार असून, दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हवामान बदलामुळे यंदा हापूसच्या लागवडीत घट झाली आहे. नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ ६० टक्के झाले असून, हंगाम उशीराने सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात कोकणातून तीन ते चार हजार पेट्यांची आवक झाली होती. कोकणातून सहा ते साडेसहा हजार पेट्यांची आवक झाली आहे.
आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. चार ते आठ डझनाच्या पेटीला प्रतवारीनुसार १५०० ते ४५०० रुपये दर मिळाले आहेत. एक डझन तयार हापूसला प्रतवारीनुसार ४०० ते ८०० रुपये दर मिळाले आहेत. हापूसची आवक वाढली असून, दरात घट झाली आहे. यंदा हंगाम लवकर संपणार आहे. दरवर्षी हंगाम साधारणपणे ३० जूनपर्यंत सुरू असतो. यंदा हापूसचा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, असे मार्केट यार्डातीलआंबा व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.
कर्नाटक आंब्याची आवक वाढली
कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढली आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे कर्नाटकातील तुमकूर भागातील आंब्याची लागवड कमी प्रमाणावर झाली. रविवारी बाजारात कर्नाटकातील दोन डझन आंब्यांच्या दहा हजार पेट्यांची आवक झाली. लाकडी पेट्यांची आवक कमी झाली. २० एप्रिलनंतर आवक वाढणार आहे. सध्या तीन ते चार डझन कच्च्या आंब्याच्या पेटीला प्रतवारीनुसार १२०० ते १८०० रुपये दर मिळाले आहेत. एक किलो पायरीला १२० ते १५० रुपये दर असल्याची माहिती कर्नाटक आंब्यांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.
हापूसची आवक वाढली असून बाजारात कोकणातून सहा ते साडेसहा हजार पेट्यांची आवक होत आहे. मंगळवारची आवक ही हंगाम सुरू झाल्यानंतर हापूसची आवक उच्चांकी आहे. -बाळासाहेब कोंडे, विभाग प्रमुख, फळबाजार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
यंदा सुरूवातीली आंबा महाग होता. पाडव्याच्या दिवशी आंबा महाग होता त्यामुळे खरेदी करण्यासाठी गेली असता १२०० ते १५०० रूपये एक डझन होता. तोच आता आंब्याचा भाव कमी झाल्याने ४०० ते ८०० रूपये झाला आहे. यामुळे चवीला गोड आणि स्वस्त झाल्याने आंबा खरेदी परवडत आहे. -पूजा मोहिते गृहणी