'ट्रेकर्स'साठी खुशखबर ! आता गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 12:28 PM2020-11-02T12:28:18+5:302020-11-02T12:31:16+5:30

ट्रेकर्सला दिलासा : नियमांचे पालन करणे असणार बंधनकारक.!  

Good news for trekkers! Now you can go for trekking on forts | 'ट्रेकर्स'साठी खुशखबर ! आता गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी

'ट्रेकर्स'साठी खुशखबर ! आता गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला जिल्हाधिकाऱ्यांची सशर्त परवानगी

Next

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती. पण आता 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत आता जिल्ह्यातील गड किल्ले आणि डोंगर कड्यांवर ट्रेकिंगसाठी जाता येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 'ट्रेकिंग'ला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे निश्चितच ट्रेकर्सला दिलासा मिळाला आहे. 

     
ज्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने धरण परिसरातील पर्यटन निर्बंध हटविण्यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले त्याचप्रमाणे गड किल्ल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण आणि ट्रेकिंग करण्यासंबंधी परवानगी द्यावी अशी विनंती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने काही अटी आणि शर्तींसह गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. 
   
 त्यानुसार ट्रेकिंगच्या एका ग्रुपमध्ये १५ पेक्षा जास्त सदस्य नसावेत तसेच ट्रेकिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. ग्रुपमधील सदस्य संख्या अधिक असल्यास वेगवेगळे ग्रुप करून वेळेमध्ये फरक ठेवावा. ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच योग्य ते शारीरिक अंतर राखण्याबाबतचा नियम पाळण्यात यावा. दहा वर्षांच्या आतील मुले आणि पासष्ट वर्षांवरील व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये.  ताप, सर्दी खोकला असणाऱ्या व्यक्तींचा सहभाग टाळावा. स्थानिकांच्या घरात भोजन आणि मुक्काम, त्याचप्रमाणे सदस्यांनी इतरही एकत्रितपणे मुक्काम करू नये. एकमेकांच्या वस्तू उदा: मोबाईल, कॅमेरे एकमेकांनी हाताळू नयेत. 
   

या अटींचा भंग केल्यास आणि विषाणू संसर्ग होईल असे कृत्य केल्यास ही परवानगी रद्द केली जाईल तसेच संबंधितांविरुद्ध आपत्ती कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला सूचित केले आहे. 
.......

Web Title: Good news for trekkers! Now you can go for trekking on forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.