योजना चांगली; पण कागदावरच राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:13+5:302021-07-25T04:10:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना बळी कामगारांच्या वारसांंना ९० टक्के वेतन देणारी कामगार विमा महामंडळाची योजना प्रचाराअभावी कागदावरच ...

Good plan; But remained on paper | योजना चांगली; पण कागदावरच राहिली

योजना चांगली; पण कागदावरच राहिली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना बळी कामगारांच्या वारसांंना ९० टक्के वेतन देणारी कामगार विमा महामंडळाची योजना प्रचाराअभावी कागदावरच राहिली आहे. राज्यात विमाधारक कामगारांची संख्या ४७ लाख असूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी माहितीअभावी कामगार पुढे येताना दिसत नाहीत.

या ४७ लाख कामगारांच्या वेतनातूनच विम्याचा हप्ता थेट महामंडळात जमा होतो. हे बहुतांश कामगार सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्तरातील आहेत. त्यांच्यातील अनेकजण कोरोनाचे बळी ठरले असण्याची शक्यता आहे. ही संख्या नेमकी किती याची माहितीच महामंडळाच्या विभागीय किंवा मुख्य कार्यालयाकडे नाही. त्यामुळे संचालक मंडळाने कोरोना बळी कामगारांच्या वारसांना ९० टक्के वेतन दरमहा देण्याचा निर्णय घेतला तरी त्याचा लाभ द्यायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. महामंडळाच्या पुणे विभागात विमाधारक कामगारांची संख्या १५ लाख असताना या योजनेसाठी पाच जिल्ह्यांतून अवघे ८० अर्ज आले आहेत.

कोरोनात बळी पडलेल्या कामगाराच्या अंतिम संस्कारासाठी १५ हजार रुपये देणारीही योजना संचालक मंडळाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू केली. त्याचा लाभ किती जणांनी घेतला याचीही एकत्रित माहिती महामंडळाच्या मुख्य कार्यालयासह अन्य कुठे नाही.

चौकट

प्रचार व्हावा

महामंडळ प्रशासनाने कंपन्या, कामगार संघटना यांना याबाबत कळवायला हवे. या योजनेच्या प्रचाराची गरज आहे. एकूण कोरोना बळींमध्ये योजनेस पात्र कामगारांची संख्या २५ टक्क्यांपेक्षाही जास्त असेल अशी खात्री आहे. त्यांंच्या वारसांना याचा लाभ मिळायला हवा.

-उमेश विस्वाद, विभाग संघटनमंत्री, भारतीय मजदूर संघ

चौकट

आम्ही जाहिराती केल्या आहेत. रुग्णालयांबरोबर संपर्क साधून कोरोनामुळे निधन झालेल्यांची माहिती घेण्याबाबत विभागीय कार्यालयांना कळवले आहे. अंतिम संस्काराची मदत घेतली. त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. कोरोना बळी कामगारांच्या वारसांना योजनेचा उपयोग व्हावा, असा प्रयत्न आहे.

-आलोक गुप्ता, सहसंचालक, राज्य कामगार विमा महामंडळ

Web Title: Good plan; But remained on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.