चांगली कविता माणसाला खेचूनच घेते : वैभव जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:02+5:302021-09-02T04:20:02+5:30
पुणे : नवीन पिढीसमोर अनेक प्रश्न आहेत. सध्याच्या काळाचं प्रतिबिंब या कवितांमधून वाचायला मिळतं, त्यामुळे चांगली कविता माणसाला खेचूनच ...
पुणे : नवीन पिढीसमोर अनेक प्रश्न आहेत. सध्याच्या काळाचं प्रतिबिंब या कवितांमधून वाचायला मिळतं, त्यामुळे चांगली कविता माणसाला खेचूनच घेते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांनी केले. तारांगण प्रकाशनातर्फे तनया गाडगीळ लिखित ‘विवश’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर आणि संवाद पुणेचे सुनील महाजन, कवयित्री तनया गाडगीळ, तारांगण प्रकाशनाचे मंदार जोशी उपस्थित होते.
वैभव जोशी म्हणाले, "संपूर्ण पुस्तक वाचत असताना विचारांमधील प्रगल्भता अचंबित करणारी आहे. कॅलिडोस्कोपसारखी या काव्यसंग्रहातील कविता परत परत वाचताना दरवेळी वेगळं काहीतरी दाखवते. विचारांमधला ठामपणा, प्रामाणिकपणा, अंधाराची स्वीकृती या कवितांमधून जाणवते. अलीकडच्या काळातलं वाचलेलं हे चांगलं पुस्तक आहे आणि म्हणूनच ही कविता नक्की टिकेल असं मला वाटतं." तनया गाडगीळ म्हणाल्या, "नकारात्मक भावनांनाही एक मानाचे स्थान असावे. घटना आणि भावनांची कोंडी होते. त्या वेळी जाणवतं की आपण अनेक वेळा हतबल असतो. अश्रू आणि विचारांचा गुंता यातूनच ही कविता जन्माला आली आहे.
मंदार जोशी म्हणाले, "उत्तम कवयित्रीचं पहिलं लक्षण म्हणजे भावनाशील असणं. चांगल्या कवितेची अनेक वैशिष्ट्ये या काव्यसंग्रहात अनुभवायला मिळतात."
रोहन गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
फोटो आेळी - तनया गाडगीळ लिखित ‘विवश’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या हस्ते झाले. प्रकाशन समारंभास रसिक साहित्यचे शैलेश नांदुरकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, तारांगण प्रकाशनाचे मंदार जोशी उपस्थित होते.
फोटो - विवश